Ajit Pawar : पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri-Chinchwad) हौसिंग सोसायटीधारकांचे प्रश्न सुटावेत, या हेतूने शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP), माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे, माजी नगरसेविका माया बारणे यांनी आपले नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचा "संवाद सोसायटीधारकांशी" हा उपक्रम आज दसऱ्याच्या दिवशी (ता.५) थेरगाव येथे आयोजित केला होता.
त्यानंतर मिडियाशी बोलताना अजितदादांनी राज्यातील राजकीय संघर्षामुळे (शिवसेनेच्या दोन्ही गटातील) महागाई व बेरोजगारी हे महत्वाचे प्रश्न बाजूला राहताहेत, याकडे लक्ष वेधले. त्यामुळे पराकोटीला वाद गेलेल्या दोन्ही शिवसेना गटांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
दसरा मेळाव्यातून कटूता वाढणार नाही, असे शिवसेनेच्या दोन्ही गटांनी पहावे, तसे वागावे, असे आवाहनही अजितदादांनी यावेळी केले. दोघांनाही ताकद दाखवावी, पण त्याचवेळी एकमेकांचा अनादर होणार नाही, हे सुद्धा पहावे, असा सल्लाही त्यांनी दिला. माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आदी यावेळी उपस्थित होते.
शिवसेनेच्या दोन्ही गटातील वाद टोकाला गेल्याने खाली या दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनाही आपण एकमेकांचे शत्रू आहोत, असे वाटू लागले आहे. पुढाकार कोणी घ्यायचा हा ही प्रश्न आहे, असे ते म्हणाले. या राजकीय संघर्षातून राज्य अस्थिर होणार नाही, पण बेरोजगारी आणि महागाई या महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्याचवेळी कुठलीही गोष्ट फार काळ टोकाची राहत नाही, असे सांगत या दोन्ही गटांतील कटूता कमी होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील वाद प्रथम सर्वोच्च न्यायालय व आता केंद्रीय निवडणूक आयोगापुढे गेला आहे. त्यातून हे चिन्ह कोणाला मिळणार की ते गोठवले जाऊन कुणालाही न मिळण्याचीही शक्यता आहे. त्यात अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून पुढील महिन्यात त्यासाठी मतदान होणार आहे.
या अनुषंगाने जर, धनुष्यबाण चिन्ह गोठवले, तरी कोणाचेही नुकसान होणार नाही, असा निर्वाळा अजितदादांनी यावेळी एका प्रश्नाच्या उत्तरात दिला. कारण कार्यकर्त्यांनी ठरवले, तर आता सोशल मिडीयाच्या जोरावर नवीन चिन्हही अल्पावधीतच जनतेपर्यंत पोचवता येत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.