Pune News, 14 Sep : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आपल्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असतात. नुकताच त्यांचा सोलापूर जिल्ह्यातील महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यासोबत फोनवर झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
यावरून राज्यातील राजकारणही चांगलंच तापलं होतं. अशातच आता अजित पवार आणि पुण्यातील एका महिलेच्या संवादाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ही पुणेरी महिला अजितदादांना थेट गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याप्रमाणे काम करण्याचा सल्ला देताना दिसत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज पहाटे पुण्यातील केशवनगर, मुंढवा भागातील उड्डाणपुलाची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी मुंढवा सिग्नल आणि हडपसर गाडीतळची पाहणी केली. यावेळी काही नागरिकांनी अजितदादांसमोर समस्यांचा पाढा वाचला. काही नागरिकांनी पाणी मिळत नसल्याची, तर काहींनी खराब रस्त्यांची आणि वाहतूक कोंडीची समस्या दादांना सांगितली.
दरम्यान, यावेळी एका महिलेने थेट मनोहर पर्रिकर जसे ट्रॅफिक पाहण्यासाठी फिरायचे तसे तुम्ही पण फिरा असा सल्ला अजित पवारांना दिला आहे. या महिलेने दिलेला सल्ला सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
अजित पवार संबंधित महिलेला उद्देशून म्हणतात, 'तुम्ही यायच्या आधी आम्ही सगळ्या समस्या ऐकल्या आहेत. काहींनी निवेदन दिलं आहे. यामध्ये वेगवेगळ्या एजन्सी आल्या आहेत. नागरिकांना त्यांच्या सुविधा पाहिजेत, त्याच्याशी आम्ही शंभर टक्के सहमतअसून त्या संदर्भात आमचं काम सुरू आहे. आम्हाला उशीर झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि त्या कामांना अधिक कशी गती देता येईल हे पाहतो.'
त्यावर ती महिला म्हणते, 'आम्हाला खूप आशा आहेत. जसे पर्रीकर दिवसा फिरायचे ट्राफिक बघण्यासाठी तसेच तुम्ही कधीतरी ट्राफिकचा टाईम असतो, त्यावेळी येऊन बघायला पाहिजे, असं नाही की माहिती होऊ शकत नाही.' त्यावर अजित पवार, 'पर्रिकर कोण?' असा प्रश्न विचारतात. त्यावर 'गोव्याचे मुख्यमंत्री होते मनोहर पर्रीकर ते जसे फिरायचे दिवसा ट्राफिक बघण्यासाठी तसे तुम्ही कधीतरी फिरून बघा आणि न सांगता व्हिजिट करत चला. तुम्ही प्रश्न विचारणार आणि आम्ही सांगणार असं नको व्हायला.', असं महिला म्हणते.
त्यावर अजित पवार काहीस संतापून 'आम्ही प्रश्न विचारायला आलेलो नाही. मी स्वतः इथला परिसर ठीक व्हावा. सगळ्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतोय, असं म्हणतात. त्यानंतर 'असं नाही सर, इथल्या समस्या बघता इथे राहायचं की नाही हा प्रश्न पडलाय,' असं ही महिला म्हणते. त्यामुळे थेट रस्त्यावर नागरिकांनी प्रश्न विचारल्यामुळे आणि सल्ला दिल्यामुळे अजितदादा काहीसे गडबडल्याचे पाहायला मिळाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.