Ajit Pawar  Sarkarnama
पुणे

Pimpri Chinchwad Politics : अजित पवार महायुतीत आल्याने भाजप इच्छुकांची झाली गोची; आता गावाकडे जाऊन लढणार...

उत्तम कुटे

Pimpri Chinchwad News : लोकसभेची मुदतपूर्व निवडणूक तसेच ती विधानसभेबरोबरच होण्याची शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्रात सर्व राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार आतापासून जोरदार तयारीला लागले आहेत. दरम्यान, अजित पवार महायुती सरकारमध्ये सामील झाल्याने भाजपच्या पिंपरी-चिंचवडमधील एका प्रबळ इच्छुकांची गोची झाली आहे. इथे त्यांना आता 'स्कोप'च राहिला नसल्याने या प्रदेश भाजपच्या पदाधिकाऱ्याने आता गावाकडे मराठवाड्यातून लढण्याची तयारी सुरू केली आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, अजित पवार हे महायुती सरकारमध्ये सामील झाल्याने भाजपच्या या प्रदेश पदाधिकाऱ्याच्या विधानसभेला तिकीट मिळण्याच्या उरल्यासुरल्या आशा आता मावळल्या आहेत. त्यातून त्यांची स्थिती 'अभी नही तो कभी है'अशी झाल्याने 'करो वा मरो' या इर्षेने आता ते पेटले आहेत. उलट आता उघडपणे त्यांनी गावाकडे निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. कालही ते तिकडेच होते. पुढील महिन्यात ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत, असे त्यांनी आज 'सरकारनामा'ला सांगितले.

गावाकडील त्यांच्या मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेनेचे प्राबल्य आहे. मात्र, ते विचारधारा सोडणार नसल्याने शिवसेनेकडून तिकडे लढण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे राज्य पातळीवरच नाही, तर पिंपरी-चिंचवडमध्येही भाजपला हा धक्का पुढील महिन्यात बसेल, अशी शक्यता आहे.

उद्योगनगरीत पिंपरी-चिंचवडमध्ये तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील चिंचवड आणि भोसरीत भाजपचे, तर पिंपरीत राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) आमदार आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक ही महायुती म्हणून लढणार असल्याने अजित पवारांनी स्पष्ट केल्याने पिंपरी-चिंचवडमधील युतीचे जागावाटप आताच झाल्यात जमा आहे. विद्यमान आमदार व त्यांचे पक्षच तेथून लढतील. त्यामुळे इतरांना तेथे संधीच उरलेली नाही.

परिणामी यापूर्वी शहरातून आमदारकी लढलेल्या भाजपच्या या पदाधिकाऱ्याने आता गावाकडे ती लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे ते सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये कमी, गावाकडेच जास्त दिसत आहेत. पिंपरी महापालिकेतही मागील टर्मला ते पदाधिकारी होते. मात्र, राष्ट्रवादीतून आलेल्यांनी पक्ष काबीज केल्याने हे जुने एकनिष्ठ भाजपचे पदाधिकारी नाराज असल्याचे दिसून आले. त्यातून त्यांनी जर आमदारकीसाठी पक्ष सोडला, तर भाजपला तो मोठा धक्का असणार आहे. कारण त्याचा फटका लोकसभा, विधानसभेपेक्षा पिंपरी महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला बसण्याची दाट शक्यता आहे.

(Edited by - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT