Parth Pawar Sarkarnama
पुणे

Parth Pawar : शिरूरमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांचा 'पंच'; पार्थ पवारांच्या 'खासदारकी'साठी ठरणार 'लकी'!

Shirur Lok Sabha Constituency : अजित पवारांचे अमोल कोल्हेंना चॅलेंज, तर सुनेत्रा पवारांचे शिरूरमध्ये दौरे वाढले

Sunil Balasaheb Dhumal

Pune Political News : राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री होत अर्थमंत्री, पुण्याचे पालकमंत्री पद मिळवले. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार बारामती सीट निवडून आणण्यासाठी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, बारामतीसह, शिरूर आणि इतर सात अशा एकूण नऊ लोकसभा जागांसाठी पवार आग्रही आहेत. त्या जागा निवडून आणण्याचा चंगच त्यांनी बांधला आहे. बारामतीतून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उमेदवारी मिळण्याची शक्यता असतानाच शिरूरमधून त्यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे.

पार्थ पवारांनी गेली निवडणूक मावळमधून लढवली होती. त्यावेळी त्यांचा दारुण पराभव झाला होता. आता शिरूर लोकसभा मतदारसंघातील काही गावांत सुनेत्रा पवारांनी सामाजिक उपक्रम राबवण्यास सुरुवात केल्याने पार्थ यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. गेल्यावेळी मावळ त्यांच्यासाठी टफ गेला होता. शिरूर मतदारसंघ मात्र त्यांच्यासाठी सोपा वाटत आहे. सध्याच्या बदलेल्या राजकीय स्थितीचा शिरूरसाठी अजित पवार कशी रणनीती आखतात, हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्यावेळी शिरूरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ.अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीकडे असल्याने अजितदादांनी शिरूरमधून आपला उमेदवार असणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी खासदार अमोल कोल्हेंचा पराभव करणार असल्याचे खुले चॅलेंजही दिले आहे. दरम्यान, त्यांनी कुठल्याही उमेदवाराची घोषणा केली नसली तरी अजित पवार गटाने शिरूरमध्ये फिल्डिंग लावल्याचे दिसत आहे. सध्या सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) शिरूरमधील काही गावांत विविध सामाजिक उपक्रमांत दिसून येत आहेत. त्यामुळे येथून पुत्र पार्थ यांच्या नावाची चर्चा आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात जुन्नर, आंबेगाव, खेड, भोसरी, हडपसर आणि शिरूर हे विधानसभा मतदारसंघ येतात. या मतदारसंघातील भोसरी सोडला तर इतर पाच आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचेच आहेत. जुन्नरमध्ये अतुल बेनके, आंबेगावचे दिलीप वळसे पाटील (Dilip Walse), खेडचे दिलीप मोहिते, हडपसरचे चेतन तुपे आणि शिरूरला अशोक पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत.

यातील वळसे पाटील, तुपे, मोहिते, बेनके हे अजित पवारांसोबत (Ajit Pawar) आहेत, तर पवारांनी भूमिका स्पष्ट केली नसली तरी ते पार्थ यांना मदतच करतील, अशी चर्चा आहे. राहिला प्रश्न भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांचा, तर ते महायुतीचा धर्म पाळतील. त्यामुळे शिरूरमधून पार्थ पवारांचा विजयाचा मार्ग सुकर होईल, असे बोलले जात आहे.

दरम्यान, गेल्या निवडणुकीत शिरूरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अमोल कोल्हे 58 हजार 483 मताधिक्यांनी खासदार बनले होते. त्यांना सहा लाख 35 हजार 880 मते मिळाली होती, तर विरोधातील शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटलांना (Shivajirao Adhalrao Patil) पाच लाख 77 हजार 347 मते मिळाली होती. 2019 मध्ये शिरूरमध्ये एकूण 21 लाख 20 हजार 988 मतदार होते. त्यापैकी 12 लाख 92 हजार 381 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. आता येथून अजित पवार कुणाला उमेदवारी देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT