Ghodganga Sugar Factory Sarkarnama
पुणे

Ghodganga Sugar Factory : अजितदादांचा फॉर्म्युला मान्य करावा; अशोक पवारांचे आवाहन, ‘घोडगंगा’चे कामगार मात्र संपावर ठाम...

नितीन बारवकर

Shirur News : राज्य सरकारचे प्रतिनिधी या नात्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर संचालक मंडळ व कामगार प्रतिनिधींशी चर्चा करून समन्यायी 'फॉर्म्युला' ठरवला आहे. अनेक महत्वाचे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ठरविलेला हा फॉर्म्युला संचालक मंडळाने मान्य केला. मात्र, कामगार प्रतिनिधींनी अमान्य केला आहे, अशी माहिती कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा आमदार ॲड. अशोक पवार यांनी दिली. अजितदादांनी ठरवून दिलेला फॉर्म्युला कामगारांनी मान्य करावा आणि संप मागे घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. ( Ajitdada's formula should be accepted by ghodganga sugar factory workers; Ashok Pawar)

दरम्यान, आपल्या दहा महिन्यांच्या थकीत वेतनासाठी संप करत असलेल्या घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फॉर्म्युला फेटाळून लावला आहे. आमच्या थकीत पगाराची किमान ५० टक्के रक्कम मिळावी, या मागणीवर संपकरी कामगार ठाम आहेत. हे कामगार गेल्या दीड महिन्यांपासून संपावर गेले आहेत.

कामगारांची कुठलीही देणी कारखान्याकडून बुडणार नाहीत, असे स्पष्ट करून आमदार अशोक पवार म्हणाले की, गेल्या दहा महिन्यांच्या थकीत पगारासह इतर मागण्यांसाठी गेल्या दीड महिन्यांपासून कामगार संपावर गेले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी अजितदादांना या विषयात लक्ष घालण्याचे आवाहन करून तसे निवेदन दिल्यावर अजितदादांनी तातडीने संचालक मंडळ व कामगार प्रतिनिधींची पुण्यात बैठक घेतली.

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्य सहकारी बॅंकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार व इतर महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यांनी कामगारांच्या थकीत पगाराच्या दहा टक्के रक्कम व भविष्य निर्वाह निधीची रक्कम लगेच द्यावी. उर्वरित रक्कम कारखान्याकडे फिक्स डिपॉझिट दाखवून त्यावरील व्याज व पुढे थकीत पगार टप्प्याटप्प्याने द्यावेत, असे सूचविले.

याबाबत संचालक मंडळ व कामगार प्रतिनिधींनी आपापसांत सामंजस्य करार करावा, अशी सूचना त्यांनी केली. ती संचालक मंडळाने मान्य केली मात्र कामगार प्रतिनिधींनी इतर कामगारांशी चर्चा करावी लागेल असे सांगत संप चालूच ठेवला आहे. यावरूनच त्यांनी अजितदादांनी सूचविलेला फॉर्म्युला अमान्य केल्याचे स्पष्ट होते.

कारखान्यावर एक युनियन असताना दुसऱ्या युनियनचे नेते म्हणविणारे आणि कारखान्याशी संबंध नसणारे हा संप चिघळवत असतील तर कायदेशीरदृष्ट्या ते अयोग्य आहे, असे नमूद करून ॲड. पवार म्हणाले की, प्राप्त परिस्थितीत कारखानदारीसमोर अनेक आव्हाने व अडचणी असताना कामगारांना सबुरीने घेण्याबाबत समजावून सांगितले पाहिजे. परंतु काहीजण जाणीवपूर्वक तेल टाकून वातावरण पेटते कसे, राहील हेच बघत आहेत, असा आरोपही आमदार पवार यांनी केला.

अशोक पवार म्हणाले की, अनेक सभासद शेतकरी कारखान्यावर जमले असता सोपानराव गवारे व सोपानराव भाकरे या संचालकांनी कामगार प्रतिनिधींशी संपर्क साधून समन्वयाबाबत विनंती केली. मात्र, अजितदादांच्या फॉर्म्युल्यावर चर्चा करण्यास कामगार प्रतिनिधींनी नकार दिला. अजितदादांसोबतच्या बैठकीमध्ये प्रथम तुम्ही हो म्हटले आणि आता चर्चा टाळणे हे योग्य नाही.

आमदार ॲड. पवार यांनी सांगितले की, १२५ कोटी रूपयांच्या सहवीजनिर्मीती प्रकल्पामुळे व वीज खरेदी करार न झाल्याने कारखाना अडचणीत आला आहे. एक ते दोन लाख लिटर इथेनॉल रोज तयार होईल एवढ्या क्षमतेचा प्रकल्प असला पाहिजे. दैनंदिन सुमारे दहा लाख टन उसाचे गाळप करणारे आणि पाच लाख लिटर इथेनॉल तयार करणारे कारखाने अंदाजे सव्वा कोटी रूपये पगार महिन्याला वाटतात आणि गेली दहा वर्षे साखरेचे दर कायम असताना, व्याजाचा भुर्दंड बसत असताना घोडगंगाचा पगार महिन्याला पावणेदोन कोटी रूपये आहे.

तालुक्याचे माजी आमदार (स्व.) रावसाहेबदादा पवार यांनी कष्टाने आणि जिद्दीने उभी केलेली हि शेतकऱ्यांची कामधेनू असलेली संस्था वाचली पाहिजे, असे सर्वसामान्य शेतकरी व उसउत्पादक सभासदांचे म्हणणे आहे. ती वाचविण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन पवारांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT