Alandi News : आळंदी (ता. खेड) नगर परिषदेच्या 10 प्रभागांमधून 21 नगरसेवक आणि नगराध्यक्ष, असे 22 सदस्य निवडून जाणार आहेत. सामाजिक प्रश्नापेक्षा गावकी, भावकी आणि पैसा या मुद्द्यांवरच स्पर्धा आहे. नगराध्यक्षासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप यांच्यामध्ये चुरस असून, 2 अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. तर, 21 सदस्यपदांसाठी भाजप, राष्ट्रवादी आणि काही जागांवर शिवसेना लढत आहे.
आळंदीत गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना, असा सामना रंगला होता, तर राष्ट्रवादीचा एकही उमेदवार रिंगणामध्ये नव्हता. भाजपचे नगराध्यक्ष अवघ्या 37 मतांनी निवडून आले होते. यंदा मात्र राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी खुली लढत होत असून, शिवसेना मात्र उमेदवार देऊ शकली नाही. सदस्यपदासाठी भाजपने नगरसेवकाच्या सर्वच्या सर्व 21 जागांवर उमेदवार दिले. राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) प्रभाग एक आणि प्रभाग सातमध्ये उमेदवार दिलेला नाही आणि प्रभाग दोन व प्रभाग आठमध्ये प्रत्येकी एक; तर उर्वरित प्रभागांमध्ये प्रत्येकी दोन उमेदवार, असे 14 उमेदवार उभे केले आहेत.
शिवसेनेने 10 उमेदवार उभे केले आहेत. मात्र, प्रभाग 3, प्रभाग 5, प्रभाग 6 आणि प्रभाग 8 मध्ये एकही उमेदवार उभा करता आला नाही. मागील वर्षभरात आढावा घेतला तर शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी आळंदीमध्ये विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने हजेरी लावली. भरघोस निधीही दिला. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून पक्षाची बांधणी केली. याचा फायदा स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांना घेता आला नाही. परिणामी नगराध्यक्षपदाचा उमेदवार मिळाला नाही. अनेक प्रभागात उमेदवारी मिळण्यास अडचण झाली.
या उलट भाजपमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच होती. मात्र, गावकी आणि भावकीच्या नादामध्ये अनेक चांगले उमेदवार राष्ट्रवादीच्या गळाला लागले. त्यामुळे राष्ट्रवादीला चांगले उमेदवार देता आले. आता खरी लढत राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यामध्येच आहे. राज्यात भाजपची सत्ता असल्याने आणि आळंदी शहरामध्ये भाजपचे संघटन गेल्या 10 वर्षांत मजबूत झाले. मात्र, तिकीट वाटपात दुखावलेले कार्यकर्ते अन्य पक्षाकडून उभे राहिले. त्यामुळे भाजपची (BJP) काही प्रभागांमध्ये अडचण झाली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे स्टार प्रचारक स्थानिक पातळीवर नसल्याचे चित्र आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.