Jayshree Palande
Jayshree Palande Sarkarnama
पुणे

Jayshree Palande : पक्षाने फ्री हॅण्ड दिल्यास शिरूरमधील सर्व संस्था भाजपच्या ताब्यात आणून दाखवेन : जयश्री पलांडेंचे अप्रत्यक्ष पवारांना चॅलेंज

नितीन बारवकर

शिरूर (जि. पुणे) : भारतीय जनता पक्षाने (BJP) फ्री हॅण्ड दिल्यास शिरूर (Shirur) तालुक्यातील सर्व संस्था ताब्यात घेऊन दाखवू, अशी ग्वाही शिवसेनेतून भाजपत नुकतेच दाखल झालेल्या माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पलांडे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant Patil) यांच्यासमोरच दिली. (All institutions in Shirur will be brought under BJP's control : Jayshree Palande)

दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश करताच जयश्री पलांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवार यांना आव्हान दिल्याचे मानले जात आहे. कारण, शिरूर तालक्यातील बहुतांश संस्था अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. त्याबाबतच पलांडे यांनी भाष्य केले आहे.

शिरूर तालुका भाजपच्या वतीने न्हावरे फाटा येथील निसर्ग मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यात पलांडे बोलत होत्या. पलांडे यांंनी नुकताच भाजपत प्रवेश केला आहे. तत्पूर्वी त्यांनी पुणे जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही काम केले आहे.

पलांडे म्हणाल्या की, शिरूर तालुक्यात भाजप पक्षसंघटना तळागाळात रूजविण्यासाठी मी सुरवातीच्या काळात मनापासून प्रयत्न केले. मात्र, माजी आमदार (स्व.) बाबूराव पाचर्णे यांच्याशी विचार न जुळल्याने वाद टाळण्यासाठी पक्षातून बाजूला गेले. त्यांचा मुलगा राहुल पाचर्णे हे मला मुलासारखा आहे. आता कुठलीही महत्वाकांक्षा न बाळगता एक सामान्य कार्यकर्ती म्हणून पक्षात आले आहे. पक्ष पुढील काळात जी जबाबदारी देईल, ती चोखपणे पार पाडण्यासाठी सर्वस्वी योगदान देईल.

आगामी २०२४ च्या निवडणुकीत शिरूरचा आमदार हा भाजपचा होईल. मी जे बोलतो, ते मी कष्टाच्या जिवावर बोलते. कुठल्याही भांडवलाच्या जिवावर बोलत नाही. कारण कष्ट हेच माझे भांडवल आहेत. शिरूर तालुक्यात मोठी बहिण म्हणून भाजपची वाढ करण्यासाठी अखेरपर्यंत लढत राहीन, असा शब्दही पलांडे यांनी या वेळी पक्ष नेतृत्वाला दिला.

मी ज्यावेळी राष्ट्रवादीत गेले, त्यावेळी मी गाडीवर कधीही घड्याळ लावले नाही. शिवसेनेत गेले तरीही धनुष्यबाण लावला नाही. मात्र, भाजपत प्रवेश करण्यापूर्वीच गाडीवर कमळाचे चिन्ह लावले होते. कारण माझ्या मनात भाजप पूर्वीपासूनच होता. त्यामुळे प्रवेशाला जाताना कमळाचे चिन्ह लावूनच गेले, असेही जयश्री पलांडे यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT