Ajit Pawar-Rajendra Pawar Sarkarnama
पुणे

Power Politic's : पवार घराण्यात सगळ्या काकांना पुतण्याच दिसतो (आवडतो); राजेंद्र पवारांनी उलगडला इतिहास!

Rajendra Pawar Statement : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदा जेव्हा श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवली, तेव्हा आप्पासाहेब पवार यांनी त्यांना मदत केली होती.

सरकारनामा ब्यूरो

Baramati, 28 August : सांगली जिल्ह्यातील एन. डी. पाटील विधी महाविद्यालयाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले पुतणे आमदार रोहित पवार यांचा विधानसभा निवडणुकीतील विजय आणि पोस्टल मतदान याबाबत विधान केले होते. त्याला रोहित पवार यांचे वडिल राजेंद्र पवार यांनी उत्तर देताना पवार कुटुंबातील परंपरेची आठवण करून दिली आहे. तसेच, ‘पवार घराण्यात सगळ्या काकांना पुतण्याच दिसतो. (आवडतो). माझ्या वडिलांनीही (आप्पासाहेब पवार) अजितदादांना संधी दिली होती,’ असेही सांगितले.

इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे बुधवारी (ता. 27 ऑगस्ट) शेतकरी मेळावा झाला. मेळाव्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे, राजेंद्र पवार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. त्या मेळाव्यात राजेंद्र पवार यांनी पवार कुटुंबातील परंपरा आणि विद्यमान पिढीबाबत भाष्य केले. ते करताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राजकीय वाटचालीतील सुरुवातीच्या टप्प्याबाबत भाष्य करताना पवार घराण्यात प्रत्येक पुतण्याला काकांनी मदत केली आहे, ही परंपराच आहे, असेही सांगितले.

राजेंद्र पवार (Rajendra Pawar) म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदा जेव्हा श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची (Chhatrapati Cooperative Sugar Factory) निवडणूक लढवली, तेव्हा आप्पासाहेब पवार यांनी त्यांना मदत केली होती. पहिल्यांदा निवडणूक लढविणाऱ्या नवख्या उमेदवाराला किती मते मिळतात, हे आपल्या सर्वांना महितीच आहे. पण, त्यानंतर तब्बल 35 वर्षे अजितदादांनी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे नेतृत्व यशस्वीपणे केले.

अजित पवार यांनी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात झालेल्या कार्यक्रमात बोलताना रोहित पवार यांच्याबाबत पोस्टल मतदानाबाबत भाष्य केले होते. त्यालाही राजेंद्र पवारांनी उत्तर दिले. ते म्हणाले, ‘काहीजण पोस्टल मतांवर निवडून आले, पण काळ बदलतो, वेळ बदलते.’

राजेंद्र पवार यांनी आपल्या राजकात न येण्यामागची पार्श्वभूमीही विशद केली. ते म्हणाले, ‘छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर मला संधी मिळेल, असे मला वाटले होते. वडील माझा विचार करतील, असं मला त्यावेळी वाटलं होतं. पवार घराण्यात सगळ्या काकांना पुतण्याच दिसतो (आवडतो). मला तिथेही बघितलं गेलं नाही, तेव्हा माझ्या वडिलांनी (आप्पासाहेब पवार) अजितदादांना संधी दिली.

तिसऱ्यांदा छत्रपती कारखान्यावर जाण्याची संधी मिळाल्यावर सांगण्यात आलं की ‘सगळ्यांनी राजकारणात यायचं नसतं. मला त्यांचं बोलणं पटलं आणि त्यानंतर मी शांत राहिलो, असेही राजेंद्र पवार यांनी स्पष्ट केले.

अजितदादा केबिनमध्ये गेले; आम्ही मागेच राहिलो!

गाईंच्या व्यवसायातील एक गमतीशीर किस्साही राजेंद्र पवार यांनी सांगितला. ते म्हणाले, मी आणि अजितदादा गायी आणायला गेलो होतो. त्या वेळी अजितदादा हे केबिनमध्ये बसले. आम्ही मात्र मागे गाईच्या शेपटाजवळ बसलो होतो. अजितदादा पुढच्या केबिनमध्ये गेले. आम्ही मात्र मागेच राहिलो. माझी गाय तीन हजार रुपयांनाला गेली, तर अजितदादांची नऊ हजार रुपयांना विकली गेली होती, असे सांगून त्यांनी अजितदादांच्या व्यापारी कौशल्याचे कौतुकही केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT