Sagar Tapkir and Shekhar Kate Sarkarnama
पुणे

NCP Crisis: राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील युवा पदाधिकारी आपापसांतच भिडले

Sagar Tapkir Vs Shekhar Kate: दोन्ही गटांच्या नेत्यांवरील टीकेवरून तरुण पदाधिकाऱ्यांत जोरदार जुंपली

उत्तम कुटे

Pimpri News: राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर दोन्ही गटांनी आपापली बांधणी नव्याने सुरु केली आहे. मात्र, आता दोन्ही गटात राजकीय संघर्ष आणि आरोप-प्रत्यारोप होत आहेत. याचा प्रत्यय पिंपरी-चिंचवडमध्ये आला आहे. येथे दोन्ही गटांच्या नेत्यांवरील टीकेवरून त्यांच्या तरुण पदाधिकाऱ्यांत जोरदार जुंपली आहे.

राष्ट्रवादीचा (शरद पवार गट) शहरात नुकताच महाराष्ट्राभिमान युवक मेळावा झाला. त्यात गुजरातला गेलेले प्रकल्प अजित पवारांनी परत आणून दाखवण्याचे आव्हान युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिले होते. तसेच अजितदादा हे राष्ट्रवादीत असताना वाघ होते, भाजपसोबत गेल्यावर त्यांना निर्णय घेऊ दिले जात नाहीत, असेही ते म्हणाले होते.

आता त्याच्या टीकेला प्रत्युत्तर देताना अजित पवार गटाच्या युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष शेखर काटे यांनी अजित पवारांवर टीका केल्याशिवाय काहींचा दिवस जात नाही, असा हल्लाबोल मंगळवारी केला. त्याचा समाचार बुधवारी युवक राष्ट्रवादीचे नवनियुक्त शहर कार्याध्यक्ष सागर तापकीर यांनी घेतला.

शरद पवारसाहेबांनी राष्ट्रवादीची स्थापना करून अनेक सर्वसामान्य घरातील लोकांना आमदार, खासदार केले. राज्यात जो काही राष्ट्रवादीचा जनाधार आहे तो केवळ आणि केवळ त्यांच्यामुळे आहे, असे असतांना पक्षाच्या विचारधारेच्या विपरीत जाऊन, विकासाचं घोंगडं पांघरून काही मंडळी सत्ताधारी पक्षात सामील झाली. ज्या साहेबांनी तुम्हाला मोठे केले, मानसन्मान दिला, त्यांना उतारवयात तुम्ही निवडणूक आयोग दाखवला, अशा गद्दारांनी आम्हाला शिकवू नये, असा घणाघात तापकीर य़ांनी केला.

महाराष्ट्रभिमान युवक मेळाव्यास मिळालेला मोठा प्रतिसाद बघून काटेंसारखे नैराश्यातून प्रतिक्रिया देत आहेत, असे ते म्हणाले. मेहबुब शेख यांनी युवकांच्या बेरोजगारीवर प्रश्न केले होते. एखाद्या मुद्द्यावर प्रश्न केला गेल्यास त्याचं तांत्रिक उत्तर न देता जागा दाखवण्याची भाषा केली जाते, काटेंनी आपली राजकीय अपरिपक्वताच निदर्शनास आणून दिली आहे,असा टोलाही त्यांनी लगावला.

Edited by Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT