Amit Shah Pune Visit Sarkarnama
पुणे

Amit Shah: अमित शाहंच्या पुणे दौऱ्यावरून वातावरण तापलं : विरोध केल्यास कॉंग्रेस नेत्यांना उजळ माथ्याने फिरू देणार नाही; भाजप शहराध्यक्षांचा इशारा

Amit Shah Pune Visit, Congress Protest, BJP: १ ऑगस्ट रोजी अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यावरून काँग्रेसने निषेध आंदोलनाची घोषणा केली असून, भाजपने जंगी स्वागताची तयारी केली आहे. त्यामुळे पुण्यात राजकीय संघर्षाची शक्यता वाढली आहे.

Sudesh Mitkar

Amit Shah Pune Visit: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या १ ऑगस्ट रोजी होणाऱ्या पुणे दौऱ्यावरून पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. NEET परीक्षा घोटाळा आणि दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील पोलीस कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेसने अमित शाह यांच्याविरोधात निदर्शने करण्याची हाक दिली आहे. तर दुसरीकडे, काँग्रेसच्या या आक्रमक भूमिकेला भाजपने तितक्याच आक्रमकतेने प्रत्युत्तर दिले असून, "इलाका तुम्हारा, धमाका हमारा रहेगा!" असा थेट इशारा देत अमित शाह यांचे जंगी स्वागत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यामुळे पुण्यातील दोन्ही प्रमुख पक्ष आमने-सामने आले आहेत.

काँग्रेसची आंदोलनाची हाक; 'त्या' पोलीस कारवाईचा निषेध

NEET परीक्षेतील पेपरफुटी आणि त्यानंतर देशभरात उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने केंद्र सरकार आणि केंद्रीय गृहमंत्रालयावर जोरदार निशाणा साधला आहे. दिल्लीत शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस बळाचा वापर करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या हिंसक कारवाईत अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याचा दावा करत, पुणे शहर (पूर्व) काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याला तीव्र विरोध दर्शवला आहे.

१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता सेव्हन लव्हज चौक, शंकरशेठ रोड येथे अमित शाह यांच्या नियोजित प्रवास मार्गावर काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवण्यासाठी पुणेकर, तरुण आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन काँग्रेसकडून करण्यात आले आहे.

भाजपचे सडेतोड उत्तर : "उजळ माथ्याने फिरू देणार नाही"

काँग्रेसच्या या आंदोलनाच्या हाकेला भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अमित शाह यांचा हा दौरा राजकीय नसून लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, असे स्पष्ट करत भाजपने काँग्रेसचे आरोप फेटाळून लावले आहेत.

"अमित शाह कोणत्याही राजकीय कार्यक्रमासाठी पुण्यात येत नाहीत. काँग्रेस या विषयाला नाहक राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसने जिथे आंदोलनाची घोषणा केली आहे, तिथेच भाजप अमित शाहंचे अभूतपूर्व आणि जंगी स्वागत करेल. 'इलाका तुम्हारा, धमाका हमारा रहेगा!' काँग्रेसने जर गनिमी काव्याने काही करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्या नेत्यांना पुण्यात इथून पुढे उजळ माथ्याने फिरता येणार नाही." असा इशारा धीरज घाटे यांनी दिला आहे.

१ ऑगस्टला पुण्यात राजकीय संघर्ष अटळ?

एकीकडे काँग्रेसने गृहमंत्र्यांच्या ताफ्याला अडवण्याचा आणि निषेध करण्याचा पवित्रा घेतला आहे, तर दुसरीकडे भाजपने त्याच ठिकाणी उत्तर देण्याची तयारी दर्शवली आहे. १ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संघर्ष होणार हे मात्र निश्चित आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT