Amol Kolhe News Sarkarnama
पुणे

Amol Kolhe News : लोकशाही, सध्या तुझा आवाज खाली गेल्यासारखा जाणवतोय; खासदार कोल्हेंचे मार्मिक भाष्य

उत्तम कुटे: सरकारनामा

Amol Kolhe NCP MP : फर्डे वक्ते असलेले शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे आपल्या प्रतिस्पर्ध्यावरही सभ्य भाषेत, पण मार्मिक टीका करीत असतात. असेच भाष्य त्यांनी देशातील सद्यस्थितीवर काल (ता.२३) केले. लोकशाहीने प्रश्न विचारण्याचा हक्क दिला असला, तरी सध्या तो विचारण्याची देशात मुभा नाही, मोकळीक नाही असे सांगत जर, तो विचारला तर, लगेच 'ट्रोल'धाड येते आणि देशद्रोहाचा शिक्का बसतो, अशी खंत त्यांनी सध्याच्या देशातील लोकशाहीवर व्यक्त केली.

''लोकशाही, सध्या तुझा आवाज खाली गेल्यासारखा जाणवतोय'', अशी खंतवजा विचारणा लोकशाहीलाच खासदार कोल्हेंनी केली. 'झी' मराठीवरील खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात ते बोलत होते. त्यात एका टप्यात मुलाखतकर्त्याला एकाशी फोनवरून बोलण्यास सांगितले जाते. त्यातून तो आपल्या कधी आधी मोकळ्या न केलेल्या भावनांना वाट करून देतात. त्यांच्या या अनकट फोनचा भाग सध्या सोशल मिडियावर जोरात व्हायरल झाला आहे.

खुद्द कोल्हेंनी तो आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला असून त्यावर मोठ्या प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, या मुलाखतीत नाव न घेता कोल्हेंनी केंद्रातील भाजप सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) कारभारावर हल्लाबोलही केला. लोकशाहीला केलेल्या फोनवर डॉ. कोल्हे आपल्या वेदना सांगताना म्हणाले, ऑलिम्पिकमध्ये मेडल पटकावलेल्या बेटींना दिल्लीत फरफटत नेले जाते. तेव्हा बेटी पढाव म्हणण्याचा कुठला अधिकार राहतो?

सियाचिनमध्ये मायनस चाळीस डिग्री तापमानात सैनिक देशाचे रक्षण करत असतो. तर, इकडे त्याचा बाप दिल्लीत आंदोलनात असतो. त्यात अनेकांना मग्रूर सत्ताधाऱ्यांच्या गाडीखाली चिरडले जाते, तेव्हा कुठल्या तोंडाने म्हणायचे जय जवान, जय किसान? तीस चाळीस लाख कोटी रुपयांची उद्योगपतींची कर्जे माफ होतात, त्यातील मल्या, मोदी, चोक्सी परदेशात फरार होतात आणि इकडे माझा शेतकरी मुलाला नवे कपडे घेता येत नाही, त्याच्या शाळेची फी भरता येत नाही, म्हणून आत्महत्या करतो.

या विरोधाभासाला, देशातील लोकशाहीच्या सद्यस्थितीला आम्हीच (मतदार) जबाबदार आहोत. कारण ज्यादिवशी (मतदान) आम्ही राजे असतो, त्यादिवशी सुटी असल्याने फिरायला जातो, सदविवेकबुद्धी गहाण ठेवतो, सोशल मिडीयाच्या (Social Media) प्रचाराला बळी पडतो, तर जातीधर्माच्या नावावर बटण दाबून मोकळे होतो, अशा शब्दांत नेमके, मार्मिक भाष्य त्यांनी देशातील लोकशाहीवर केले.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT