Amol Kolhe - Ajit Pawar.jpg Sarkarnama
पुणे

Amol Kolhe On Ajit Pawar : अजितदादांच्या 'गुलाबी जॅकेट' वर खासदार कोल्हेंची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले, 'असं जॅकेट घालून...'

Deepak Kulkarni

Pune News : लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी पहिल्यांदा पक्षात भाकरी फिरवली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीत मोठे बदल करताना थेट प्रवक्तेपदी तरुण नेत्यांना संधी दिली.

तर दुसरीकडे महिलांना पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी जाहिराती,ग्राफिक्समधे गुलाबी रंगाचा वापर वाढवल्याचे दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वत: गुलाबी जॅकेटचा वाढता वापर करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट ) या अभियानाची चर्चा वाढवली. आता त्यांच्या याच जॅकेटवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून खोचक प्रतिक्रिया आली आहे.

शिरूरमधून लोकसभा निवडणुकीत अजितदादांचं तगडं आव्हान परतवून लावत खासदारकी मिळवलेल्या अमोल कोल्हेंचा (Amol Kolhe) आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे.त्यांनी आता थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला आहे. कोल्हे यांनी अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटवर खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, अजितदादा गुलाबी जॅकेट घालतात. त्यामागचा हेतू राज्याचं वातावरण गुलाबी करण्याचा असू शकतो. मात्र, तसं काही होईल असं मला वाटत नाही. कारण जॅकेट घालून कधी राजकारण होत नाही असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

राज्यात सध्या तीन कावळ्यांचं सरकार..!

खासदार अमोल कोल्हे यांनी यावेळी महाराष्ट्रातील महायुती सरकारवरही टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, सध्या राज्यामध्ये तीन कावळ्यांचं सरकार आहे. महायुती ते तीन कावळे आहेत. भला न बोलो,भला न देखो, भला न सुनो या अविर्भावात ते वागतात आणि एकमेकांसोबतच त्यांची चढाओढ सुरू असल्याचेही कोल्हे यांनी यावेळी सांगितले.

राज्यात सध्या विशाळगड हिंसाचारावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या मुद्द्यावरुन शाब्दिक चकमकी झडत आहे. यावरही खासदार कोल्हे यांनीही विशाळगड प्रकरणावर थेट भाष्य केले. ते म्हणाले, विशाळगडावरील अतिमण पावसात हटवण्यात येत होतं. त्यामुळे कोर्टाने त्यावर आक्षेप घेतला. हा निर्णय योग्य आहे, पण यामागे नेमकं राजकारण कोण करतंय हा संशोधनाचा भाग असल्याचा चिमटाही कोल्हे यांनी यावेळी काढला.

नरेश अरोरांचा सल्ला....?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. आता त्यांनी विधानसभेसाठी जोरदार प्लॅनिंग सुरू केले आहे. याचाच भाग म्हणून त्यांनी नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स कंपनीला आपल्यासोबत घेतले आहे. या कंपनीने या आधी कर्नाटकमध्ये डी. के. शिवकुमार यांच्यासाठी काम केलेले आहे. आता महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी ही कंपनी काम करत आहे. त्यानुसार राष्ट्रवादी पक्षाने लक्षणीय बदल करण्यास सुरूवात केल्याचे दिसून येत आहे.

अजित पवार यांनीही आपल्या दैनंदिन वापरातील कपड्यात गुलाबी रंगाची छटा असणारे जॅकेट वापरण्यास सुरूवात केली आहे. संपूर्ण अधिवेशन कालावधीत अशाच प्रकारचा त्यांचा पेहराव पाहायला मिळाला. काही दिवसांपूर्वी बारामतीमध्ये अजित पवार गटाचा जनसन्मान रॅलीची सभा पार पडली. त्यावेळी अजित पवारांची छबी महिलांना अनुकूल असल्याचे दाखवण्यासाठी गुलाबी रंगाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT