Anand Dave News : कसबा पोटनिवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीनं आपले उमेदवार जाहीर केले आहेत. हेमंत रासने आणि रविंद्र धंगेकर यांच्यात लढत होणार आहे हे स्पष्ट झालं आहे. मात्र, याचवेळी संभाजी ब्रिगेड, आप यांच्यासह हिंदू महासंघानेही कसबा पोटनिवडणुकीत उडी घेतल्यानं आता ही निवडणूक अटीतटीची होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आता आरोप- प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.
हिंदू महासंघाने कसबा पोटनिवडणूक लढविण्याचं जाहीर केलं आहे. यात आनंद दवे हे उमेदवार असणार आहे. त्यांनी शैलेश टिळक यांची टिळकवाड्यात जात भेट घेतली होती. त्यांनी दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या प्रतिमेला अभिवादन केले होते. मंगळवारी (दि.७) दुपारी सारसबाग येथील वीर सावरकर पुतळ्याला अभिवादन करुन हिंदू महासंघाच्या पदाधिकार्यांसोबत अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांनी भाजपसह काँग्रेसच्या उमेदवाराला खुल्या चर्चेचं आव्हान दिलं आहे.
दवे म्हणाले, युती आणि आघाडीचे दोघेही उमेदवार वीस वीस वर्ष नगरसेवक राहिले आहेत. तसेच वेगवेगळ्या पक्षातून नगरसेवक होऊनही रविवार पेठ भागाचा विकास का झाला नाही असा सवाल दवेंनी रविंद्र धंगेकरांवर निशाणा उपस्थित केला आहे.
यावेळी त्यांनी भाजप उमेदवार हेमंत रासनें(Hemant Rasne)वरही सडकून टीका केली आहे. सलग 5 वर्ष स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळालेला कसबा हा एकमात्र मतदारसंघ आहे. पण याठिकाणी स्थायी समिती काही दिसली नाही. जी आश्वासनं आत्ता देत आहात, देणार आहात ते पूर्ण करण्यासाठी कोणी अडवलं होतं तुम्हांला हे आम्हांला दोघांना विचारायचं आहे असेही दवे यावेळी म्हणाले.
यावेळी हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी कसबा पोटनिवडणुकीतील भाजपने दिलेल्या उमेदवारीवरून ब्राम्हण समाजात तीव्र नाराजी पसरल्याचे सांगितले. तसेच भाजपकडून चिंचवडमध्ये न्याय तर कसब्यात अन्याय केल्याचा आरोपही यावेळी केला.
आनंद दवे म्हणाले, "जो न्याय भाजपकडून चिंचवड मतदारसंघातून दिवंगत आमदार लक्ष्मण जागताप यांच्या कुटुंबांस दिला तोच न्याय कसब्यातून टिळक कुटुंबियांना मिळेल अशी अपेक्षा होती. पुणे जिल्ह्यात २१ मतदार संघ आहेत. त्यातील कोथरूड आणि कसबा असे दोन विधानसभा मतदार संघाचं उमेदवार हे ब्राम्हण समाजाचे नेतृत्व करत होते. ते ब्राम्हण समाजाच्या व्यथा, वेदना व्यवस्थित मांडत होते.
आता या उमेदवारीच्या प्रकरणामुळं टिळक कुटुंबाचं राजकारण संपल्यात जमा आहे. यामुळं ब्राम्हण समजात तीव्र नाराजी पसरली आहे असं सांगतानाच ब्राम्हण समाजाने हिंदू महासंघाकडे त्यांच्या भावना पोहचविल्या आहेत. त्यामुळं पक्षानं उमेदवारीबाबत पुनर्विचार करावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.