Wablewadi School  Sarkarnama
पुणे

Wablewadi School News : वाबळेवाडीत असे फुटले वादाला तोंड अन्‌ वारे गुरुजी चौकशीच्या फेऱ्यात अडकले

Vijaykumar Dudhale

Pune News : अथक परिश्रम घेऊन दत्तात्रेय वारे यांनी शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी शाळा नावारूपाला आणली. गावातील काही गोष्टींवर खर्च होणारा पैसा त्यांनी विद्यादानासारख्या पवित्र कार्याकडे वळविला. त्यातून वाबळेवाडी ही राज्यातील झेडपीची पहिली टॅबलेट शाळा अस्तित्वात आली. अवघ्या तीस विद्यार्थिपट असलेल्या शाळेचा पट पाचशेंच्यावर गेला आणि पहिलीच्या ६० जागांसाठी ३५०० विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी लागली आणि येथूनच वादाला सुरुवात झाली. त्यानंतर वारे गुरुजींच्या मागे चौकशीचा फेरा लागला. (....And Ware Guruji got stuck in the round of inquiry)

अनेक उपक्रम आणि प्रयोगासाठी वाबळेवाडी ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून खासगी शिक्षक नेमले. एकीकडे दत्तात्रेय वारे गुरुजींनी भौतिक सुविधा वाढवल्या, दुसरीकडे, शिष्यवृत्ती परीक्षेतही वाबळेवाडीचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकू लागले. त्यामुळे प्रवेशासाठी रांगा लागू लागल्या. पहिलीच्या ६० जागांसाठी तब्बल ३५०० विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी लागू लागली आणि येथेच माशी शिंकली. आमच्या काही विद्यार्थ्यांना प्रवेश दिला नाही म्हणून बोगस तक्रारदार पाठवून प्रशासकीय त्रुटींमध्ये दत्तात्रय वारे यांना गोवले गेले. त्यातून त्यांचे २२ नोव्हेंबर २०२१ रोजी निलंबन झाले.

प्रतिवाबळेवाडी उभारत पटकावला झेडपीचा अध्यक्ष चषक

वाबळेवाडी ज्या जिल्हा परिषद गटात येते, त्या शिक्रापूर-सणसवाडी जिल्हा परिषद गटाच्या सदस्या कुसूम मांढरे यांची एकही तक्रार शाळेविरोधात नसताना तत्कालीन जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार, पाबळ जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सविता बगाटे, टाकळी हाजी जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सुनीता गावडे यांनी तत्कालीन सीईओ आयुष प्रसाद यांच्यापुढे हा प्रश्न उपस्थित केला. आयुष प्रसाद यांनी २२ नोव्हेंबर २०२१ रोजी वारे गुरुजींची बदली वाबळेवाडीतून खेड तालुक्याच्या दुर्गम जालिंदरनगर शाळेत केली. एवढ्या वादळातही वारे यांच्यातील शाळेसाठी झोकून देण्याची तयारी थोडीही कमी झाली नव्हती. कारण जेमतेम ३ विद्यार्थिपटाच्या जालिंदरनगर शाळाही वारे गुरुजींनी विकसित करून तेथील विद्यार्थिपट १२५ पर्यंत नेला. तसेच प्रतिवाबळेवाडी शाळा उभारून पुणे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष चषक एकाच वर्षाच्या कामाने पटकावला.

आमदार अशोक पवारांना गावबंदी

वाबळेवाडी शाळेतील अनियमिततेची चौकशी तब्बल दोन वर्षे चालली. शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तराने संपूर्ण राज्याला आश्चर्य वाटले. उत्तरात फडणवीसांनी वाबळेवाडी शाळेचे कौतुक तर केलेच. शिवाय अशा शाळा राज्यात उभ्या राहण्याची गरजही बोलून दाखवली. मुंबईत या घडामोडी घडत असताना वाबळेवाडीचे ग्रामस्थ पुन्हा संतप्त झाले. त्यांनी गावसभा घेऊन आमदार अशोक पवारांना गावबंदी केली. या घटनेची राज्यात चर्चा झाली.

स्वीडनच्या दोन शाळांशी सामंजस्य करार

वाबळेवाडी शाळेचा लौकिक एवढा झाला होती की, स्वीडनच्या गोटलॅंड आणि एम. जी. स्कूल या दोन शाळांनी वाबळेवाडी शाळेशी सामंजस्य करार करून अभिनव शिक्षणपद्धती विकसित करायला सुरुवात केली होती. यासाठी स्वीडनमधील शाळेचे प्रतिनिधी व विद्यार्थी वाबळेवाडीत १५ दिवस राहून गेले, तर वारे गुरुजीही तब्बल १० दिवस स्वीडन येथे जाऊन तेथील शाळांना भेटी दिल्या. वाबळेवाडीतील ३० विद्यार्थी स्वीडनमध्ये २१ दिवसांसाठी पाठविण्याच्या तयारीत ते होते. मात्र, शाळेविषयाच्या तक्रारी, अनियमिततेचा आरोप आणि चौकशीचा फेरा सुरू झाला.

चौकशीचा घटनाक्रम

१४ जुलै २०२१ : तोंडी तक्रार असल्याचे सांगत ‘बीडीओं’नी शाळेत येऊन वारे गुरुजींची चौकशी केली

१६ जुलै २०२१ : शाळेची दफ्तरतपासणी न करता गंभीर अनियमितेचा अहवाल बीडीओंकडून जिल्हा परिषदेला सादर.

२७ जुलै २०२१ : जिल्हा परिषद चौकशी समितीची स्थापना.

२९ जुलै २०२१ : शाळाबाह्य व्यक्तीचा तक्रार अर्ज पुणे जिल्हा परिषदेकडे दाखल.

९ सप्टेंबर २०२१ : चौकशी पूर्ण करून अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर.

२२ नोव्हेंबर २०२१ : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिरूरच्या तीन जिल्हा परिषद सदस्यांचा वारेंच्या विरोधात गदारोळ.

२२ नोव्हेंबर २०२१ : चौकशी पूर्ण होऊनही तत्कालीन सीईओ आयुष प्रसाद यांच्याकडून हस्तक्षेप होऊ नये म्हणून वारे यांचे निलंबन.

१ फेब्रुवारी २०२२ : खेड तालुक्यातील जालिंदरनगर येथील शाळेत नियुक्ती.

५ सप्टेंबर २०२३ : लोकसहभागातूनच जालिंदरनगर येथे १०० विद्यार्थिपटाच्या शाळेची उभारणी; पुणे जिल्हा परिषदेकडून अध्यक्ष चषक जाहीर.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT