Wablewadi School News : वारे गुरुजींनी वाबळेवाडी यात्रेतील तमाशा बंद केला अन्‌ राज्यातील पहिली टॅबलेट शाळा बनवली!

Story of Ware Guruji : शाळेच्या उद्‌घाटनाला आमदार येणार म्हटल्यावर रस्त्याचा प्रश्न आला. गावातीलच एकाचे डिझेल, एकाचा ट्रॅक्टर अन् स्वत: ड्रायव्हर बनून वारे गुरुजींनी शाळेपर्यंतचा रस्ता करून घेतला.
Wablewadi School
Wablewadi SchoolSarkarnama
Published on
Updated on

Pune News : शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेला देशात नव्हे; तर जगाच्या नकाशावर पोचविणारे दत्तात्रय वारे गुरुजी यांच्यावर लोकवर्गणीतून करण्यात आलेल्या कामांमध्ये अनियमितता झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्या प्रकरणी पुणे जिल्हा परिषदेने नेमलेल्या चौकशी समितीने वारे गुरुजींना दोषमुक्त केले आहे. त्यानिमित्ताने ३० विद्यार्थ्यांचा पट पाचशेंच्या पुढे नेत वाबळेवाडी शाळेला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचविणाऱ्या वारे गुरुजींच्या कार्याचा हा आढावा.... (Ware Guruji made the first tablet school in Wablewadi)

वाबळेवाडी शाळेचे जनक दत्तात्रय वारे यांची ही विद्यार्थी समर्पित शिक्षण पद्धतीची परंपरा त्यांचे वडील बबनराव काशिनाथ वारे (वय ८९) यांनी १९८५ पासून वाबळेवाडीत सुरू केली. संपूर्ण गावाला एकत्र करून शाळेत सर्वताेपरी योगदान देण्याची त्यांचा वसा त्यांचे चिरंजीव दत्तात्रय वारे यांनी १९९६ मध्ये दौंड तालुक्यातील गरदरेवाडी येथे शिक्षक म्हणून पहिल्यांदा रुजू झाल्यावर पुढे सुरू ठेवली.

Wablewadi School
Wabalewadi School Case : वारे गुरुजींना प्रकाश महाजनांच्या अशाही शुभेच्छा!

गरदरेवाडी जिल्हा परिषद शाळेत त्या काळी जेमतेम १६ विद्यार्थिसंख्या होती. दत्तात्रय वारे गुरुजींनी जनतेला एकत्र करून तब्बल दीड एकर जागा शाळेसाठी गावाकडून घेतली. वर्गखोल्या उभारणीसाठी त्यांनी लोकवर्गणी गोळा केली आणि शाळेच्या उद्‌घाटनाला दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल यांचे वडील दिवंगत आमदार सुभाष कुल यांना बोलावले. शाळेच्या उद्‌घाटनाला आमदार येणार म्हटल्यावर रस्त्याचा प्रश्न आला.

Wablewadi School
Supriya Sule Indapur Tour : शोभते ना पवारसाहेबांची लेक...?

गावातीलच एकाचे डिझेल, एकाचा ट्रॅक्टर अन् स्वत: ड्रायव्हर बनून वारे गुरुजींनी शाळेपर्यंतचा रस्ता करून घेतला. त्यानंतर दिवंगत कुल यांच्या हस्ते लोकसहभागातील वर्गखोल्यांचे उद्‌घाटन केले. त्यावेळी त्यांनी शाळेचा गुणात्मक लौकिक वाढविण्यासाठी शिष्यवृत्तीसाठी काही विद्यार्थी बसविले. पहिल्याच प्रयत्नात सुप्रिया गरदरे विद्यार्थिनी शिष्यवृत्तीच्या जिल्हा गुणवत्ता यादीत चमकली. गरदरेवाडीत वारे गुरुजी २००१ पर्यंत होते.

गरदरेवाडीतून वारे गुरुजींची बदली शिरूर तालुक्यातील त्यांचे मूळ गाव असलेल्या जातेगाव बुद्रुक शेजारील जातेगाव खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत झाली. वारेंनी या ठिकाणीही लोकसहभागातून शाळा विकासाचा पॅटर्न सुरू केला. जातेगाव खुर्दमध्येही त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने तब्बल पाच ते सहा एकर जागा जिल्हा परिषद शाळेला मिळविली. त्यात त्यांनी तत्कालीन मुख्याध्यापक जयसिंग नऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली दीड एकरात क्रीडांगण, तर उर्वरित जागेत नारळ व आंब्याची बाग फुलविली. त्यानंतर त्यांची बदली तालुक्यातीलच ३० विद्यार्थीपटाच्या वाबळेवाडी शाळेत २०१२ मध्ये झाली. ही बदली रद्द करण्यासाठी जातेगाव खुर्दच्या ग्रामस्थांनी अनेक प्रयत्न केले. मात्र, त्यात ते अयशस्वी ठरले.

Wablewadi School
Supriya Sule To Pankaja : पंकजांच्या मदतीला धावल्या सुप्रिया सुळे; म्हणाल्या, ‘गोपीनाथ मुंडे हयात नाहीत; म्हणून त्यांच्या लेकीशी...’

वाबळेवाडीचा प्रवास

वाबळेवाडी या द्विशिक्षकी शाळेत वारे गुरुजींचा २०१२ पासून प्रवास सुरू झाला. प्रथम त्यांनी वाबळेवाडी ग्रामस्थांची बैठक घेऊन गावच्या यात्रेतील तमाशा थांबविला. तमाशावर खर्च होणारी लोकवर्गणी शाळेसाठी वापरण्याचा निर्णय घेतला. तोही सहजासहजी झाला नाही. पण वारे गुरुजींनी आपली चिकाटी सोडली नाही. त्या लोकवर्गणीतून शाळेसाठी टॅब घेण्यात आले आणि राज्यातील जिल्हा परिषदेची पहिली टॅबलेट शाळा अस्तित्वात आली. मुलांच्या हातातील वही-पेन कमी करून त्यांनी २०१२ मध्ये टॅबलेट स्कूल सुरू केले. गुरुजींच्या या रचनात्मक कामाला प्रसारमाध्यमांनी उचलून धरले. त्याचा फायदा विद्यार्थीपट १०० च्या पुढे जाण्यासाठी झाला.

तीस विद्यार्थ्यांची शाळा गेली पाचशेंच्या पुढे

विद्यार्थ्यांचा पट शंभरच्या पुढे गेल्यानंतर वर्गखोल्या अपुऱ्या पडू लागल्या. त्यानंतर जागा, इमारत आणि वाबळेवाडी ग्रामस्थांचा एकत्रित प्रवास सुरू झाला. केवळ भौतिक सुविधांमध्ये न अडकता गुरुजींनी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त तब्बल १५ अनोखे शैक्षणिक उपक्रम सुरू केले. त्यात आविष्कार लर्निंग सेंटर, ॲग्री मीडियम स्कूल, ब्रेन जिम, बहुभाषा शिक्षण, रोबोटिक्स, विषय मित्र योजना, सहध्यायी अध्ययन, आर्ट अँड क्राफ्ट, संगीत शिक्षण, इंग्लिश संवाद, ॲडव्हान्स अभ्यासक्रम, कोडिंग व प्रोग्रामिंग, ई-सोल्यूशन, हायड्रोपोनिक आदींचा समावेश होता. या सर्वांचा परिणाम असा झाला की, २०१८ मध्ये शाळेची पटसंख्या पाचशेच्यावर पोचली. शिक्षक कमी पडू लागल्याने त्यांनी पुढील वर्गातील मुलांनी खालच्या वर्गातील मुलांना शिकविण्याची आणि सर्व वर्ग एकत्र बसवून शिकविण्याची विषय मित्र संकल्पना सुरू केली. याच दरम्यान त्यांना तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. (पूर्वार्ध)

Wablewadi School
Devdatta Nikam News : वळसे पाटलांची साथ सोडलेल्या नेत्यावर पवारांनी सोपवली मोठी जबाबदारी...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com