Pune Municipal Corporation Sarkarnama
पुणे

Bjp News : कौतुक भाजप पदाधिकाऱ्यांचे निधी मात्र पालिकेचा; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पडले 30 लाखांना !

Chaitanya Machale

Pune News : पुणे शहरात केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या नॅशनल बुक ट्रस्टच्या वतीने डिसेंबर महिन्यात पुणे बुक फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी पुस्तक वाचन केल्याने त्याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली. या कार्यक्रमामुळे आयोजकांचे विविध स्तरातून कौतुक करण्यात आले. मात्र, आता या कार्यक्रमाच्या आयोजनात पुणे महापालिकेचा सहभाग असल्याने यासाठी 30 लाख रुपये पालिकेला द्यावे लागणार आहेत.

लहान मुले, शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने पुण्यात १६ ते २४ डिसेंबर या कालावधी पुणे बुक फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा, यासाठी महापालिकेला याचे सहप्रायोजक देखील करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या सुचनेनुसार एस. पी. कॉलेजच्या मैदानावर ' स्टोरी टेलिंग गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड' करण्यात आले. यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि त्यांचे पालक सहभागी झाले होते.

पुणे बुक फेस्टिव्हलचे समन्वयक म्हणून जबाबदारी असलेले राजेश पांडे (Rajesh Pande)हे भाजपचे (Bjp) महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाच्या संयोजनात भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा मोठा सहभाग होता. राज्य तसेच केंद्रातील काही व्यक्ती देखील या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होत्या. त्यामुळे कार्यक्रमाला राजकीय रंग असल्याची चर्चा सुरू होती. हा कार्यक्रम भाजपने आयोजित केल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात होती. त्यातच आता या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी 30 लाख 37 हजार रुपये पालिकेला द्यावे लागणार आहेत. त्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समिती समोर ठेवला आहे.

हा कार्यक्रम अचानकपणे आयत्या वेळेस पालिकेला कळवण्यात आला होता त्यासाठी पालिकेने सहप्रयोजक व्हावे, असे सूचनाही राज्यस्तरावरून महापालिकेला देण्यात आल्या होत्या. त्यामुळे या कार्यक्रमासाठी पालिकेच्या बजेटमध्ये तरतूद उपलब्ध नव्हती. परिणामी ही रक्कम वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवण्यात आलेला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या उपक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होण्यासाठी एस. पी. कॉलेजच्या मैदानावर या कार्यक्रमासाठी पाच हजार पालक, पाच हजार मुलांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी मांडव, कापडी मास्किंग, स्वागत कमानी, खाद्य पदार्थांचे स्टाॅल उभारण्यात आले होते. तसेच इतर खर्च देखील करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी महापालिकेला निधी द्यावा लागणार असल्याने या रेकॉर्डचा खर्च पुणेकरांच्या खिशातून जाणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

निधी नसल्याने वर्गीकरणाद्वारे पैसे उपलब्ध करण्याचा प्रस्ताव

या कार्यक्रमाबरोबरच सारसबागेत याच काळात बालोत्सव साजरा करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठीही पालिकेकडून खर्च करण्यात आला आहे. या दोन्ही कार्यक्रमाचे खर्च देण्यासाठी पालिकेकडे निधी नसल्याने वर्गीकरणाद्वारे हे पैसे उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे स्वच्छतागृह बांधणे, विरंगुळा केंद्र यासाठी ठेवलेल्या निधीचे वर्गीकरण करून हे पैसे दिले जाणार आहेत. यामध्ये वडगावशेरी भागात स्वच्छतागृह बांधणे, हिंगणे येथील विरंगुळा केंद्र, आणि कोंढवा येथील सिव्हिक कल्चर सेंटरच्या कामांच्या निधीचा समावेश आहे.

(Edited by : Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT