Satara Bribe News sarkarnama
पुणे

ACB Action Against Bribers : महापालिकेच्या पाणीमीटर रिडर प्लंबरकडून २५ हजाराची लाच घेताना रंगेहात अटक

सरकारनामा ब्यूरो

ACB Action Against Bribers : गेल्या महिन्यांत पिंपरी-चिंचवडमध्ये तीन ट्रॅप करणाऱ्या एसीबीने आता आपल्या या कारवाईचा मोर्चा पुणे शहराकडे वळवला आहे. गेल्या १५ दिवसांतच त्यांनी पुण्यात तीन लाचखोरांना पकडले. त्यातील ताजी कारवाई काल (ता.११) त्यांनी केली. पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील मीटर रिडर उमेश राजाराम कवठेकर (वय ५४) याला एका प्लंबरकडून २५ हजाराची लाच घेताना त्याच्या चतुशृंगी पाणीपुरवठा विभाग कार्यालय आवारातच पकडण्यात आले.

एरव्ही लाचखोरीच्या आलेल्या तक्रार अर्जाची छाननी करण्यासाठी काही दिवस घेणाऱ्या पुणे एसीबी युनीटने काल एका दिवसात ती ट्रॅपही यशस्वी केला,हे विशेष. त्यात कवठेकर पकडला गेला. त्याने आपल्या दोन वरिष्ठांसाठी लाचेतील प्रत्येकी दहा हजार रुपये असे वीस हजार रुपये घेतल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ते दोन वरिष्ठ अधिकारीही आता अडचणीत येणार आहेत.त्यांनाही एसीबी अटक करू शकते.

एका बिल्डरच्या मिळकतीला पाणीपुरवठा विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांच्याकरिता काम करणाऱ्या परवानाधारक प्लंबरककडून ही लाच कवठेकरने मागितली होती. ती त्याने आपल्या कार्यालयाच्या आवारातच बिनधास्त स्वीकारली. त्याबाबत डेक्कन पोलिस ठाण्यात लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीचे पीआय संदीप वर्हाडे पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, पिंपरी-चिंचवडनंतर आता पुण्यातील लाचखोरीवर एसीबीने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यातून त्यांनी गेल्या १५ दिवसांत लाच घेताना तिघांना पकडले. त्यातील दोघे हे पुणे पालिकेचे कर्मचारी आहेत. याअगोदर गेल्या महिन्याच्या ३० तारखेला प्रवीण दत्तात्रेय पासलकर (वय ५०) या पुणे पालिकेच्या बिगाऱ्याला एक लाख रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले होते.

पालिकेतूनच रिटायर्ड झालेल्या मुकादमाच्या अर्जित रजेचा चेक देण्यासाठी त्याने ही लाच घेतली होती. तर,त्याच महिन्याच्या २४ तारखेला `महावितरण`च्या धानोरी शाखा कार्यालयातील सहाय्यक अभियंता अभियंता हर्षाली ओम ढवळे (वय ३८) यांना १२ हजार रुपयांची लाच मागितल्याच्या गुन्ह्यात अटक झाली होती. त्यांनी ही लाच महावितरण ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याकडून वीजमीटर मंजूरीसाठी घेतली होती.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT