Shirur, 24 March : शिरूर तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या सभापती आणि उपसभापतिपदाची निवडणूक अखेर अपेक्षेनुसार बिनविरोध झाली. या निवडणुकीत माजी आमदार अशोक पवारांना मोठा धक्का बसला असून त्यांच्या गटाचे सातपैकी तब्बल चार संचालक फुटून आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या पॅनेलला मिळाले आहेत. या फुटीची कुणकुण लागल्यानेच माजी आमदार पवार यांनी पदाधिकारी निवडीतून मागे घेतल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या चार संचालकांच्या पाठिंब्यामुळे सत्ताधारी कटके गटाला अधिकच बळकटी आली आहे.
शिरूर खरेदी विक्री संघाच्या (Shirur Kharedi-Vikri Sangh) सभापतिपदी राजेंद्र नरवडे यांची, तर माजी आमदार अशोक पवार यांच्या पॅनेलमधून सत्ताधारी गटाकडे आलेले बाळसाहेब नागवडे यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाली. उपसभापती बाळासाहेब नागवडे यांच्यासह अशोक पवारांच्या पॅनेलमधून निवडून आलेल्या चार संचालकांनी आज सत्ताधारी पॅनेलला पाठिंबा दिला, त्यामुळे सत्ताधारी महायुतीच्या पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.
खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत सतरापैकी १२ संचालक बिनविरोध निवडले गेले होते. त्यातील दहा संचालक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे हेाते, तर दोन जागा या माजी आमदार अशोक पवार (Ashok Pawar) गटाच्या होत्या. उर्वरीत पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सर्वच सर्व पाच जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आलेले बहुतांशी संचालक हे पूर्वाश्रमीचे अशोक पवारांचे समर्थक आहेत, त्यामुळे अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत चमत्कार घडेल, अशी चर्चा होती.
अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत चमत्कार घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना अशोक पवार गटाला सुरूंग लावल्याचे चार दिवसांपूर्वी स्पष्ट झाले होते. त्यामुळे अशोक पवारांनी दोन दिवसांपूर्वीच आपण निवडणुकीत लक्ष घालणार नाही, असे स्पष्ट केले होते. अशोक पवार गटाच्या फुटीवर आज शिक्कामोर्तब झाले. सुमारे दोन ते तीन संचालक फुटल्याचा आकडा असताना अशोक पवारांचे तब्बल चार संचालक फुटल्याचे पदाधिकारी निवडीत स्पष्ट झाले. हा अशोक पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
सभापती आणि उपसभापती निवडीपूर्वी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा पक्षनिरीक्षक अण्णासाहेब महाडिक यांनी संचालकांची मते जाणून घेतली. तसेच त्यांनी महायुतीच्या नेत्यांशीही संवाद साधला.
उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याशी चर्चा करून सभापतिपदासाठी राजेंद्र नरवडे, तर उपसभापतिपदी बाळासाहेब नागवडे यांची निवड निश्चित केली. ही दोनच नावे सभापती-उपसभापतिपदासाठी आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.