Raj Thackeray, Ashok Saraf
Raj Thackeray, Ashok Saraf  Sarkarnama
पुणे

Ashok Saraf : ''...तर अशोक सराफ मुख्यमंत्री असते!''; राज ठाकरे असं का म्हणाले?

सरकारनामा ब्यूरो

Raj Thackeray And Ashok Saraf News : अशोक सराफ ही व्यक्ती दक्षिणेत असती तर आज ते मुख्यमंत्री असते. आणि त्यांच्या ४० फूट कटआउटवर दूध टाकलं गेलं असतं. पण आपल्याकडं कलावंत आहे का मग ठीक आहे एवढ्यावरच आटोपलं जातं अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी सिनेसृष्टीतील विनोदाचे अनभिषिक्त सम्राट व ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्याविषयी कौतुकोद्गार काढतानाच दुसरीकडे महाराष्ट्रातील कलाक्षेत्राकडे बघण्याच्या संकुचित वृत्तीवर देखील बोट ठेवले.

पुण्यात मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ(Ashok Saraf) यांच्या ७५ व्या वाढदिवशी राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, प्रशांत दामले यांनी साडेबारा हजार प्रयोग केले. अशोक सराफ यांनी नाटक, चित्रपट, सिरीअल येथे काम केलंय. आता फक्त ओटीटी प्लॅटफार्म राहिलाय. इतकी वर्षे हे कलाकार काम करतात. अशोक सराफ ही व्यक्ती दक्षिणेत असती तर आज ते मुख्यमंत्री असते. ४० फूट कटआउटवर तुमच्यावर दूध टाकलं गेलं असतं. आपल्याकडं कलावंत आहे का ठीक आहे. एवढ्यावरच आपल्याकडं आटोपलं जातं असंही राज ठाकरेंनी ( Raj Thackeray) यावेळी सांगितलं.

कलाकाराचं महत्त्व काय असतं हे परदेशात गेल्याशिवाय समजत नाही. रोममध्ये लिओवार्दी द विंची च्या नावानं एअरपोर्ट असतो. आपल्याकडं कलावंतांच्या नावानं चौक असतात अशी खंतही राज ठाकरे यांनी व्यक्त केली. तसेच प्रतिमा जेवढ्या जपल्या जातात, तेवढ्या प्रतिभा जपल्या जात नाहीत. पण अशोक सराफ यांचा कलावंत म्हणून मी नेहमीच त्यांचा आदर करत आलो आहे असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

खरा सीमाप्रश्न तुम्ही सोडवलात....

यावेळी राज ठाकरे यांनी अशोक सराफ यांचं मूळ घराण बेळगावचं असल्याचं आणि तुमचा जन्म मुंबईचा असल्याचं आज कळलं असं म्हणाले. मला असं वाटतं, खरा महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न तुम्ही सोडवलात अशा शब्दांत त्यांनी सीमावादावर देखील मिश्किलपणे भाष्य केलं.

राज ठाकरे राजकारणातला ब्रिलियंट माणूस...

राजकारणात ब्रिलियंट माणूस फार अभावानं आढळतो. पण राज ठाकरे यांच्याकडं राजकारणातला ब्रिलियंट माणूस म्हणून पाहतो. कारण ते राजकारण, समाजकारणात अभ्यास करून बोलतात. असे लोकं फार कमी असतात. मराठी, हिंदी चित्रपट सृष्टीवर प्रेम असणारा हा उत्कृष्ट कलावंत आहे. इंडस्ट्रीत काय घडलं याची माहिती असते असं स्तुतीसुमनं अशोक सराफ यांनी राज ठाकरे यांच्यावर उधळले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT