Pimpri Chinchwad News :
Pimpri Chinchwad News : Sarkarnama
पुणे

Pimpri Chinchwad Politics : पहिल्याच अधिवेशनात छाप पाडलेल्या आमदार जगतापांचे पावसाळी अधिवेशनासाठी साडेसात डझन प्रश्न!

उत्तम कुटे

Pimpri Chinchwad News : विधानसभेत आणि विधानपरिषेदेत दोन दोन टर्म घालवूनही काही आमदार तोंड उघडत नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. मात्र चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनी जगताप (MLA Ashwini Jagtap) यांनी नेहमी प्रमाणे आपल्या कामाचा धडका सुरू ठेवण्याच्या तयारीत दिसत आहेत. राज्य विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनासाठी जगतापांनी विविध खात्यांशी संबंधित एकूण ८१ प्रश्न दिले आहेत. सोमवारपासून (ता.१७) पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. (Latest Marathi News)

मागील अर्थसंकल्पी अधिवेशनात अनुदानावरील पर्यटन आणि सांस्कृत्रिक विभागाच्या चर्चेत सहभाग होताना मतदारसंघाच्या जोडीने लगतच्या मावळमधील विषयांवरही आमदार जगताप बोलल्या होत्या, हे विशेष. २६ फेब्रुवारीला चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले. त्याचा निकाल २ मार्चला लागला. विजयी झालेल्या आमदार अश्विनी जगतापांचा आमदारकीचा शपथविधी ९ मार्चला झाला. मात्र, त्यापूर्वीच त्या कामाला लागल्या होत्या.

६ मार्चला त्यांनी सांगवी येथील पुणे जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन उपचाराविना रुग्णांना घरी पाठवणाऱ्या तेथील डॉक्टरांना फैलावर घेतले होते तर, आमदारकीला तीन आठवडे व्हायच्या आत विधानसभेतील चर्चेत भाग घेऊन आपल्या कामाची चुणूक दाखवली होती. त्यानंतर मे महिन्यात तर, त्यांनी थेट दिल्लीच गाठली. चिंचवड मतदारसंघातून जाणाऱ्या पुणे-बेंगलोर हायवेच्या सर्व्हिस रोडच्या दुरुस्तीसाठी केंद्रीय रस्ते व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनाच निवेदन देऊन साकडे घातले होते. त्यांचे पती आणि चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे सुद्धा मतदारसंघातील नव्हे, तर त्याबाहेरीलही प्रश्न विधानसभेत मांडत होते. त्यांचाच कित्ता त्यांच्या पत्नीही पुढे गिरवीत आहेत.

कामाचा हा धडाका आमदार जगतापांनी पावसाळी अधिवेशनात ८१ प्रश्न देत पुढे चालूच ठेवला आहे. विविध खात्यांशी सबंधित हे प्रश्न राज्यभरातील आहेत. अनेक विकासकामातील अनियमता आणि घोटाळ्यावर त्यांनी बोट ठेवत चौकशीची मागणी केली आहे. त्यात भाजपचीच सत्ता असलेल्या पिंपरी महापालिकेत गेल्या पाच वर्षात झालेल्या काही कामांचाही समावेश आहे. फक्त त्यांनी दिलेल्या ८१ प्रश्नांतील किती पटलावर येतात आणि त्यातून किती प्रश्न मार्गी लागतात याची उत्सुकता आहे.

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीअंतर्गत कोट्यावधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या कारभाराची आणि पुणे जिल्हा (औंध)रुग्णालयातील औषध खरेदीच्या चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. पिंपरी-चिंचवडमधील गरवारे नायलॉन कंपनीच्या कामगारांचे २२ वर्षापासूनचे थकीत वेतन व कंपनीच्या जागेच्या खरेदी विक्रीतील अनियमिततेबाबतही त्यांनी प्रश्न दिला आहे. शहरातील मोबाईल टॉवर्सचे स्ट्रक्चरल ऑडिट आणि अनधिकृत टॉवर्सवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.

पिंपरी पालिकेच्या संभाजीनगर बर्ड व्हॅलीतील लेझर शो व फाउंटनच्या निकृष्ट दर्जावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. लाचखोरांवरील कारवाईस टाळाटाळ होत असल्याबाबत त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच प्रश्न केला आहे. उद्योगनगरीतील अनधिकृत बेकायदेशीर रूफटॉप हॉटेलवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. पिंपरी महापालिका हद्दीलगतची सात गावे पालिकेत घेण्याचा प्रलंबित प्रस्ताव मंजूर करण्याचे साकडे त्यांनी घातले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये पुण्यासारखी शिवसृष्टी उभारण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT