Ashok Pawar
Ashok Pawar Sarkarnama
पुणे

आमदार अशोक पवार यांचा पाचव्यांदा विक्रमी विजय; मोठ्या तयारीने उतरलेल्या भाजपला धक्का

नितीन बारवकर

शिरूर : अत्यंत चूरशीने झालेल्या रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या (Ghodganga sugar factory) निवडणुकीत, आमदार ॲड. अशोक पवार (Ashok Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलने, भाजपसह विरोधी पक्षांच्या घोडगंगा किसान क्रांती पॅनेलचा अक्षरशः धुव्वा उडवला.

वीस जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत विरोधकांना केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. विधानसभा निवडणुकीनंतर, मूळातच गलितरात्र झालेल्या विरोधकांना आमदार ॲड. पवार यांनी या निवडणुकीच्या माध्यमातून आणखी एक जोराचा धक्का दिल्याने तालुक्याच्या राजकीय पटलावर राष्ट्रवादी पुन्हा चा नाद घुमला.

रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या २१ जागांपैकी ब गटातून ऋषिराज अशोक पवार यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाल्याने उर्वरित वीस जागांसाठी काल (ता. ६) चुरशीने ७१. ६६ टक्के मतदान झाले. आज मतमोजणी झाली. एकूण साठ मतदान केंद्रांसाठीच्या साठ पेट्यांतील मतमोजणीला सकाळी नऊ वाजता सुरवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे विभागाचे विभागीय उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी काम पाहिले. शिरूरचे सहायक निबंधक शंकर कुंभार यांनी त्यांना साथ दिली.

मतमोजणीच्या सुरवातीला मतदान प्रतिनिधींसमोर तीस पेट्या फोडून मतमोजणी करण्यात आली. प्रत्यक्ष मतांची मोजणी दहा वाजता सुरू झाली. या मतमोजणीचा पहिला निकाल दुपारी साडेअकरा वाजता जाहिर झाला. यात मांडवगण फराटा गटातून घोडगंगा किसान क्रांती पॅनेलचे दादा पाटील फराटे यांनी विजय प्राप्त केल्याने विरोधकांच्या आशा पल्लवीत झाल्या. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे चेहरे हिरमुसले. मात्र, हे वातावरण पुढच्या अर्धा तासातच बदलले आणि आमदार ॲड. अशोक पवार यांनी त्यांच्या वडगाव रासाई गटातून तब्बल एक हजारावर मतांची आघाडी घेतल्याचे सिद्ध झाल्याने, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत उत्साह संचारला.

मांडवगण गटातील दुसरी जागाही राष्ट्रवादीकडे गेल्याने कही खूशी कही गम असे चित्र उभे राहिले. त्यानंतर इनामगाव व वडगाव रासाई गटात शेतकरी विकास पॅनेलच्या उमेदवारांनी एकतर्फी आघाडी घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरवात केली. तथापि, सर्व गटांची मतमोजणी होईपर्यंत संयम राखण्याच्या सूचना नेत्यांनी केल्या. कलांबाबत विरोधकांना आशा होत्या. मात्र, तेथेही शेतकरी विकास पॅनेलनेच बाजी मारली. दुपारी चार च्या सुमारास या गटातील मतमोजणीचे निकाल दिग्विजय आहेर यांनी जाहिर केले. आणि त्यानंतर राखीव जागांच्या मतमोजणीला सुरवात केली.

सर्वसाधारण गटांतील कल निश्चीत होताच आमदार ॲड. अशोक पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे, आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार यांची मतमोजणी केंद्रावर एन्ट्री झाली. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. आमदार अशोकबापू पवार झिंदाबाद च्या घोषणांनी कार्यकर्त्यांनी आसमंत दणाणून सोडला. यावेळी गुलालाची मुक्त उधळण करीत राष्ट्रवादी पुन्हा या गीतावर अनेक कार्यकर्ते थिरकले.

भाजप व विरोधकांच्या घोडगंगा किसान क्रांती पॅनेलचे दादा पाटील यांनी विजयी सलामी दिली. मात्र, पॅनेलला यशाकडे घेऊन जाण्यात ते असमर्थ ठरले. तेथील शेतकरी विकास पॅनेलचे संभाजी शिवाजी फराटे यांनीही दणदणीत विजय मिळविला. किसान क्रांती चे बाळासाहेब माधवराव फराटे व शेतकरी विकास पॅनेल चे दिलीप आनंदराव फराटे यांना पराभव पत्करावा लागला.

इनामगाव गटातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी एकतर्फी विजय मिळविला. या पॅनेलच्या सचिन बाबासाहेब मचाले व नरेंद्र अण्णासाहेब माने यांनी नेत्रदीपक विजय संपादन केला. किसान क्रांती च्या तात्यासाहेब हौसराव घाडगे व मच्छिंद्र सोपान थोरात यांना पराभव पत्करावा लागला. विरोधकांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या वडगाव रासाई गटात आमदार ॲड. अशोक पवार यांनी सुमारे अडीच हजार मतांच्या फरकाने एकतर्फी विजय संपादन केला. त्यांच्यासह शेतकरी पॅनेलचे दुसरे उमेदवार उमेश सुदाम साठे यांनीही आमदारांच्या पाठोपाठ विजय मिळविला. किसान क्रांती पॅनेलचे विरेंद्र दत्तात्रेय शेलार व सुभाष हनुमंत शेलार यांचा मोठा पराभव झाला.

न्हावरे गटात काही प्रमाणात चुरस दिसून आली. तेथे राष्ट्रवादीचे संजय ज्ञानदेव काळे, मानसिंग सिताराम कोरेकर व शरद मोहनराव निंबाळकर विजयी झाले. किसान क्रांती पॅनेलच्या अशोक वामन गारगोटे, पांडुरंग विठोबा दुर्गे व दत्तू कोंडीबा शेंडगे यांचा त्यांनी पराभव केला. मागील वेळी तळेगाव ढमढेरे गटाचा राष्ट्रवादीच्या पॅनेलच्या विजयात मोलाचा वाटा होता. म्हणून या वेळी त्या गटातील निकालाबाबत उत्कंठा होती. तेथे विरोधी पॅनेलला आशा लागून राहिल्या होत्या. मात्र, त्या आशा धूसर ठरवित शेतकरी पॅनेलने तीन्ही जागा मोठ्या फरकाने खिशात घातल्या. या पॅनेलचे सोपान वाल्मिकराव गवारी, विश्वास रामकृष्ण ढमढेरे व पोपट रामदास भुजबळ हे विजयी तर किसान क्रांती पॅनेलचे महेश अरविंद ढमढेरे, आबासाहेब लक्ष्मण गव्हाणे व ॲड. सुरेश रामचंद्र पलांडे हे पराभूत झाले.

शिरूर गटातून विरोधी पॅनेलचे उमेदवार तूलनेने सरस होते. मात्र, तेथे वाल्मिकराव धोंडीबा कुरंदळे, सुहास नारायण थोरात व प्रभाकर नारायण तथा आबासाहेब पाचुंदकर हे नवखे उमेदवार रिंगणात उतरवून राष्ट्रवादीने विजयी डंका वाजविला. येथून कारखान्याचे जुने माजी संचालक पांडुरंगअण्णा बळवंत थोरात, सावित्राशेठ विठोबा थोरात व अशोक धर्माजी माशेरे यांना अपयशाचे तोंड पहावे लागले.

महिलांसाठीच्या दोन्ही जागांवर राष्ट्रवादीच्या मंगल सुहास कोंडे व वैशाली सुनिल जगताप यांनी किसान क्रांती च्या मंदाकिनी अंकुशराव नागवडे व सुवर्णाताई बिभीषण फराटे यांचा पराभव करून एकतर्फी विजय संपादन केला. अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातून किसान क्रांतीच्या शांताराम अण्णासाहेब कांबळे यांना हरवून शेतकरी पॅनेलचे उत्तम रामचंद्र सोनवणे विजयी झाले.

इतर मागास प्रवर्ग मतदार संघातून राष्ट्रवादीच्या शिवाजी मुक्ताजी गदादे यांनी किसान क्रांती च्या राहुल संभाजी गवारे यांना हरविले. भटक्या विमुक्त जाती, जमाती विशेष मागास प्रवर्गातून विद्यमान संचालक बिरा बाबू शेंडगे यांनी किसान क्रांती च्या बाळासाहेब बाबा कोळपे यांना हरवून फेरविजय संपादन केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT