Jayashree Marne join NCP  Sarkarnama
पुणे

कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीचा राष्ट्रवादीत प्रवेश अन् भातखळकर म्हणाले, एकच गुन्हा...

पुणे महापालिका (PMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापले असून, फोडाफोडीला सुरवात झाली आहे.

सरकारनामा ब्युरो

पुणे : पुणे महापालिका (PMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापले असून, फोडाफोडीला सुरवात झाली आहे. माजी नगरसेविका व कुख्यात गुंड गजा मारणे याच्या पत्नी जयश्री मारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला आहे. यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. भाजपचे (BJP) नेते अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. यामुळे आगामी काळात हा वाद आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

कुप्रसिद्ध गुंड गजानन मारणेच्या पत्नीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. एकच गुन्हा राष्ट्रवादी पुन्हा, असे ट्विट भातखळकर यांनी केले आहे. याला अद्याप राष्ट्रवादीकडून उत्तर देण्यात आलेले नाही. जयश्री मारणे या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून 2012 च्या महापालिका निवडणुकीत निवडून आल्या होत्या. मारणे यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीत ‘इनकमिंग’ सुरू झाले असून येत्या काळात यात आणखी वाढ होणार असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जगताप यांनी म्हटले होते. महापालिकेची पाच वर्षांची मुदत येत्या 14 मार्चला संपत आहे. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी म्हणजे 15 मार्चला भाजपाचे विद्यमान 16 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे शहराध्यक्ष जगताप यांनी सांगितले. जसजशी निवडणूक जवळ येईल, तशी ही संख्या वाढत जाईल, असा दावा जगताप यांनी केला आहे.

कोणत्याही परिस्थितीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेची सत्ता ताब्यात घ्यायचीच असा चंग राष्ट्रवादी कॉंग्रेसने बांधला आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून त्यासाठी दोन्ही शहराध्यक्षांना ताकद देण्यात येत आहे.भाजपाकडे सध्या असलेल्या नगरसेवकांमध्ये बहुसंख्यजण गेल्यावेळी राष्ट्रवादीतून भाजपात आलेले आहेत. पाच वर्षानंतर या साऱ्यांची घरवापसी करण्यात येणार आहे. या माध्यमातून भाजपाला कमकुवत करून दोन्ही शहरातील सत्ता ताब्यात घेण्याची राष्ट्रवादीची योजना आहे.

पुण्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. यापैकी सहा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. दोन मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत.आठपैकी जवळपास सर्वच मतदारसंघात भाजपची पडझड होण्याची शक्यता आहे. या सर्वच मतदारसंघातील अनेक नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यातही भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT