Baburao Pacharne Sarkarnama
पुणे

पाचर्णेंची भविष्यवाणी चुकली : पाठिंबा दिलेल्या गव्हाणेंचा दणकून पराभव

PDCC Bank Election : अशोक पवार (Ashok Pawar) यांनी एकहाती विजय मिळवला आहे.

सरकारनामा ब्युरो

पुणे : पुणे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत (PDCC Bank election) शिरुर तालुका अ वर्ग मतदार संघातून आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांनी एकहाती विजय मिळवला आहे. पवारांना १३१ पैकी तब्बल १०९ मते मिळाली. तर त्यांच्या विरोधातील आबासाहेब गव्हाणे यांना २१ मते पडली. १ मत बाद झाल्याने निकाल १०९ : २१ असा जाहीर झाला. या निमित्ताने आता आमदार-संचालक म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत अशोक पवार हे सातवे आमदार ठरले आहेत. सोबतच याच निकालामुळे भाजपचे माजी आमदार बाबूराव पाचर्णे (Baburao Pacharne) यांची भविष्यवाणीही सपशेल चुकली आहे.

आमदार अशोक पवार विरोधात सर्वपक्षीय पदाधिकारी अशी शिरुर तालुका अ वर्ग मतदार संघाची निवडणूक रंगली होती. सुरुवातीला संचालकपदाची हॅट्रिक केलेले जेष्ठ संचालक निवृत्तीआण्णा गवारेंनी पवारांसाठी माघार घेतली. त्यानंतर निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस व कॉंग्रेसचे एकेकाळचे तालुकाध्यक्ष आबासाहेब गव्हाणे यांनी आपला अर्ज कायम ठेवत थेट पवार यांना आव्हान दिले होते. त्यांच्या आव्हानाला भाजपाचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्यासह अनेकांनी थेट तर काहींनी छुपा पाठींबा दिला होता. त्यामुळे या निवडणुकीत चमत्कार करण्याची भाषाही गव्हाणे समर्थकांकडून केली गेली होती.

यावर बोलताना पाचर्णे यांनी मी पाठिंबा देणार उमेदवार जिंकतो अशी भविष्यवाणी वर्तवली होती. ते म्हणाले होते, जिल्हा बॅंक निवडणुकीत मी ज्या उमेदवाराच्या पाठीशी उभा राहतो किंवा पाठिंबा देतो, त्याचा विजय होतो, हे गेल्या सलग अनेक निवडणुकांत दिसून आले आहे. हा योगायोग समजा अथवा आमच्या मागील सामान्य मतदारांचा भक्कम पाठिंबा समजा. पण ही वस्तुस्थिती आहे. या निवडणुकीतही याच योगायोगाची पुनरावृत्ती झाल्याचे दिसून येईल. ‘मी म्हणजेच सर्व आणि सर्व काही ते मलाच हवे’ या प्रवृत्तीला रोखण्यास मतदार उत्सुक असल्याने तेच या निवडणुकीत चमत्कार घडवतील, असेही पाचर्णे यांनी सांगितले होते.

मात्र आजच्या मतमोजणीत आमदार अशोक पवार यांना १३१ पैकी १०९ मते तर आबासाहेब गव्हाणे यांना २१ मते पडली. एक मत बाद झाल्याने निकाल १०९ : २१ असा जाहीर झाला आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत आमदार-संचालक म्हणून सातवे संचालक म्हणून आमदार अशोक पवार यांनी प्रवेश मिळविला. यापुर्वी दिलीप वळसे-पाटील, अजित पवार, दत्तामामा भरणे, संजय जगताप, दिलीप मोहिते, संग्राम थोपटे व सातवे आमदार अशोक पवार यांनी बाजी मारली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT