Dhirendra Krishna Shastri Sarkarnama
पुणे

Dhirendra Krishna Shastri: आधी आक्षेपार्ह वक्तव्य; नंतर माफी अन् आता दर्शन...

Ganesh Thombare

Pune News: आपल्या व्यक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे बागेश्वर बाबा सध्या पुण्याच्या तीनदिवसीय दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यांनी देहू येथे जाऊन संत तुकाराम महाराज यांचे दर्शन घेतले. या निमित्ताने बागेश्वर बाबा यांनी यापूर्वी संत तुकाराम महाराज यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

काही महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमादरम्यान बागेश्वर बाबा यांनी संत तुकाराम महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. यानंतर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठल्यानंतर या प्रकाराबाबत बागेश्वर बाबा यांना जाहीर माफी मागावी लागली होती.

माफी मागूनदेखील या वक्तव्यामुळे त्यांच्याबाबत वारकरी समुदायात मोठ्या प्रमाणात नाराजी होती. त्यामुळे आज बागेश्वर बाबा यांनी देहूत दाखल होत संत तुकाराम महाराज यांचं दर्शन घेतलं. या वेळी पोलिसांचा मोठा फौजफाट तैनात करण्यात आला होता. बागेश्वर बाबा यांच्या सोबत भाजप नेते जगदीश मुळीक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बाबांचा पुणे दौरा ठरला वादग्रस्त

भाजप माजी आमदार जगदीश मुळीक यांनी आयोजित केलेला बागेश्वर बाबा यांचा तीनदिवसीय दौरा सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरला आहे. या दौऱ्याला अनिसने जोरदार विरोध करत हा कार्यक्रम घेऊ नये, अशी भूमिका घेतली होती तर काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांकडून आणि भीम आर्मीकडून काळे झेंडेदेखील दाखवण्यात आले होते.

तसेच संगमवाडी येथील कार्यक्रमादरम्यान व्यासपीठाजवळ जाण्यासाठी भाविकांमध्ये चढाओढ सुरू होती. त्यातून कार्यक्रम स्थळावरच्या स्वयंसेवकांसोबत वादावादीचे प्रकार घडले. आपल्याकडे व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी पास असल्याने व्यासपीठाजवळ जाण्यासाठी प्रत्येक जण आग्रही होते. बाबांच्या स्वयंसेवकांकडून भाविकांना पुढे जाण्यासाठी मज्जाव केला जात असल्याने उपस्थित नागरिकांमध्ये आणि स्वयंसेवकांमध्ये शाब्दिक चकमक उडल्याचा व्हिडिओ नुकताच वायरल झाला आहे.

गुन्हा दाखल करण्याची मागणी

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यानी पत्रकार परिषदेत घेत बाबांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. संविधानिक मूल्यांच्या विरोधात अवैज्ञानिक आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे दावे व टिप्पणी करणारे बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आहे.

असा आहे बाबांचा कार्यक्रम

पुण्यात जगदीश मुळीक फाउंडेशनकडून बागेश्वर धाम महाराज यांचा कार्यक्रम 20 ते 22 नोव्हेंबर रोजी हनुमान सत्संग कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या दरम्यानच्या बागेश्वर महाराजांचा दिव्य दरबारही भरणार आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे.

(Edited By - Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT