Adhalarao Patil and Barne  Sarkarnama
पुणे

शिंदे गटाची जय्यत तयारी! बारणे, आढळराव पाटील लागले कामाला; पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा सपाटा

Pimpri-Chinchwad News : बाळासाहेबांची शिवसेना लागली पिंपरी महापालिका निवडणुकीच्या तयारीला?

उत्तम कुटे: सरकारनामा

पिंपरी : फुटीनंतर पुणे (Pune) जिल्ह्यातील शिवसेनेचे आजी-माजी खासदार (मावळचे श्रीरंग बारणे आणि शिरूरचे शिवाजीराव आढळराव-पाटील) हे शिंदे गटात म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेनेत गेले आहेत. त्यांनी आपापल्या मतदारसंघात जोमाने पक्षबांधणी सुरु केली असून शिरुरमध्ये एका दिवशी ११७ शाखाप्रमुखांच्या नियुक्त्या नुकत्याच करण्यात आल्या. तर उद्या (ता.७) बाळासाहेबांच्या शिवसेनेची पिंपरी-चिंचवडची (Pimpri-Chinchwad) नवी व पहिली कार्यकारिणी खा.बारणे जाहीर करणार आहेत.

माजी खा.शिवाजीराव आढळराव-पाटील (Shivajirao Adhalarao Patil) हे २०२४ ला पुन्हा लोकसभा लढण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेची बांधणी शिरूरमध्ये सुरु केली आहे. तर खा.तथा उपनेते बारणेंनीही आगामी पिंपरी-चिंचवड महापालिकेची तयारी सुरु केली आहे. त्याचा भाग म्हणून ते उद्योगनगरीची कार्यकारिणी उद्या जाहीर करणार आहेत. त्यांचे खंदे समर्थक कट्टर शिवसैनिक निलेश तरस या नव्या दमाच्या तरुण चेहऱ्याला बाळासाहेबांच्या शिवसेनेचे शहरप्रमुख करण्यात आले आहे.

तर शहर महिला संघटिकेची जबाबदारी सरिता साने यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांच्या निवडीची घोषणा उद्याच्या मेळाव्यात केली जाणार आहे. त्यांच्यासह शहर कार्यकारिणीतील नव्या पदाधिकाऱ्यांच्याही नियुक्त्या जाहीर करून त्यांना पत्रे दिली जाणार आहेत. राजेश वाबळे, इऱफान सय्यद, राजू खांडभोर यांच्यानंतर काही नव्याने प्रवेश नव्या शिवसेनेत उद्या होणार असल्याचे सांगण्यात आले.

शहर कार्यकारिणी तथा फादर बॉडीसह शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघनिहायही नव्या शिवसेनेचे पदाधिकारी नेमले जाणार आहेत. मावळचे सुद्धा पदाधिकारी उद्या जाहीर केले जाणार आहेत. तरस यांची नियुक्ती धक्कातंत्र आहे. शहरातील जुन्या शिवसेनेतील म्हणजे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ज्येष्ठ पदाधिकाऱ्याला नव्या शिवसेनेचे शहरप्रमुख म्हणून संधी न देता किवळे उपनगरातील होतकरू तरुण शिवसैनिकाला ती देण्यात आली आहे हे विशेष.

किवळे हा भाग मावळमधील (Maval) चिंचवड विधानसभा मतदारसंघात येतो. तर, साने या ही मावळमधीलच पिंपरी या दुसऱ्या विधानसभा मतदारसंघाच्या जुन्या शिवसेनेच्या प्रमुख होत्या. त्यांना पदोन्नती देऊन आता महिला शहरप्रमुख तथा संघटिका करण्यात आले आहे. महत्वाच्या या दोन्ही नियुक्त्या आपल्याच मतदारसंघातील आपल्या विश्वासू पदाधिकाऱ्यांच्या खा.बारणे यांनी केल्या आहेत. त्यामुळे आता शहर कार्यकारिणीत तरी उद्या शहरातील `भोसरी`तील कोणी पदाधिकारी दिसतो का याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या मैदानात बाळासाहेबांची शिवसेना पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे, असे खा.बारणे म्हणाले. त्यादृष्टीने पक्षाचे काम सुरु असून पक्षसंघटन वाढविण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्षाचा पहिला पदाधिकारी मेळावा उद्या होत असून त्यात आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. (Pimpri-Chinchwad News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT