Bapu Pathare Sarkarnama
पुणे

Bapu Pathare News : पुण्यात भाजपला मोठा धक्का; माजी आमदार बापू पठारेंनी अखेर हातात घेतली 'तुतारी'

Sudesh Mitkar

Pune Political News : वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील भाजप नेते आणि माजी आमदार बापू पठारे यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार(Ajit Pawar) गटाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे हे आहेत. तर दुसरीकडे भाजपकडून माजी आमदार जगदीश मुळीक हे देखील इच्छुक आहेत. मात्र महायुतीतील मित्र पक्षांमध्ये झालेल्या प्राथमिक चर्चेमध्ये ज्या मतदारसंघांमध्ये ज्याचा आमदार त्याला तो मतदार संघ सोडण्याच्या निर्णयाबाबत सर्व पक्षातील वरिष्ठांमध्ये एकमत झाल्याचे सांगण्यात येत आहे.त्यामुळे हा मतदारसंघ जवळपास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्याकडे जाईल असं निश्चित मानलं जात आहे.

तर दुसरीकडे महाविकास आघाडी(Mahavikas Aaghadi)मध्ये हा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला सुटण्याची शक्यता आहे. असं असलं तरी या विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे कोणताही मातब्बर चेहरा नव्हता. त्यामुळे ह्या विधानसभा मतदारसंघात आयात उमेदवारावरतीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला दाव खेळणे आवश्यक होते.

यामुळे भाजपकडून दोन वरिष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये जाण्यास इच्छुक असल्याचं पाहायला मिळालं होतं. भाजपचे माजी नगरसेवक बॉबी टिंगरे आणि सध्या भाजपामध्ये असेलेले माजी आमदार बापू पठारे हे तुतारी घेण्यास इच्छुक असल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यातील कोणाचा पक्ष प्रवेश करून घेणार याबाबत चर्चा रंगल्या होत्या या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी बापू पठारे हे गणपती मंडळांना भेट देताना आगामी काळात आपण तुतारी हातात घेणार असल्याचं सांगत होते. त्यांच्याबाबतचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. त्यामुळे बापू पठारे यांचा प्रवेश निश्चित मानलं जात होतं. मात्र प्रवेशाची तारीख कधी असेल याबाबत चर्चांचे खल रंगले होते. अखेर आज(मंगळवारी) त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार(Sharad Pawar) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन पक्ष प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबतच त्यांचे पुत्र सुरेंद्र पठारे आणि तीन माजी नगरसेवकांनी देखील प्रवेश केला आहे. त्यामध्ये महादेव पठारे, महिंद्र पठारे आणि भैय्यासाहेब जाधव यांचा समावेश आहे.

दरम्यान हा वडगाव शेरी विधानसभा मतदार संघामधून भाजपला(BJP) मोठा फटका मानला जात आहे. या विधानसभा मतदारसंघांमधून भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुटल्यास आपण काम करणार नसल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता बापू पठारे यांनी देखील भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने भाजपासाठी हा धक्का मानला जात आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT