Baramati bypoll news : बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक घडामोडी घडल्या. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या घडामोडींच्या केंद्रस्थानी काँग्रेस पक्ष होता. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसचे आकाश मोरे मैदानात होते. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी मुंबई, दिल्लीत फोनाफोनी झाली अन् अखेर मोरेंनी माघार घेतली. या माघारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जय. पवार यांनी काँग्रेसला मोठा शब्द दिला आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघी काही मिनिटे उरलेली असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर आकाश मोरे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जात अर्ज मागे घेतला. यावेळी जय पवारही तिथेच होते. अर्ज मागे घेतल्यानंतर त्यांनी मोरे यांचे आभार मानले.
या घडामोडींनंतर जय पवार व आकाश पवार एकत्रितपणेच मीडियाला सामोरे गेले. जय पवार म्हणाले, दादांनी महाराष्ट्रासाठी सर्वांना सोबत घेऊन, सर्व पक्षांना घेऊन विकासकामे केली आहेत. एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीही एकत्रित होते. त्यावेळीही सरकार होते. आता महायुतीचे सरकार आहे. सर्व पक्षातील वरिष्ठांनी चांगला निर्णय घेतला आहे. दादांना खरी श्रध्दांजली म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो.
आणखीही काही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यावर बोलताना जय पवार यांनी सांगितले की, कालपासून सर्वच उमेदवारांना भेटतोय. इतर जिल्ह्यातील उमेदवारांचे अर्ज आहेत. सगळ्यांना निवडणूक लढण्याचा अधिकार असतो. त्यांना मी काय बोलणार?, असे जय पवार म्हणाले.
आकाश मोरे आपल्याबरोबर आहेत. आता त्यांनी माघार घेतलीय. त्यामुळे कुठेतरी आमच्याही मनाला बरे वाटतंय की, सगळेच पक्ष एकत्रित येऊन दादांसाठी ही निवडणूक लढतील. भविष्यात त्यांच्याही पक्षाच्या काही अडचणी असतील, त्यामध्ये आम्ही त्यांना साथ देऊ. काँग्रेसचे मी मनापासून आभार मानतो, असा शब्द जय पवार यांनी काँग्रेसला दिला.
यावेळी बोलताना आकाश मोरे यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून अजितदादांच्या मनातील मुख्यमंत्री झाला तर खूप आनंद होईल. २०२९ मध्ये आपण तसा प्रयत्न करूया, असे सांगितले. राष्ट्रवादी व काँग्रेस बारामतीत एकत्रितपणे काम करणार का, या प्रश्नावर आकाश मोरे यांनी हे विधान केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.