

Commissioner-CEO News : जालना महापालिकेच्या आयुक्तांचे सहा महिन्यांपासून असलेले रिक्त पद, जिल्हाधिकाऱ्यांकडे या पदाचा असलेला अतिरिक्त कारभार यामुळे विकासकामाला खीळ बसल्याची टीका होत होती. यावर प्रशासकीय आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करत सरकारने शहर व जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याचे काम केले आहे.
नुकत्याच झालेल्या प्रशासकीय बदल्यांमध्ये जालना महापालिकेच्या आयुक्तपदी अंजली शर्मा यांची तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कृष्णकांत कनवारिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही अधिकारी पती-पत्नी आहेत. त्यामुळे जालन्याचा कारभार आता या आयएएस अधिकारी जोडी पाहणार आहेत.
कनवारिया हे मुळेच झारखंड केडरचे अधिकारी आहेत. मात्र, अंजली शर्मा यांच्याशी विवाहामुळे त्यांनी केडर बदलून महाराष्ट्र घेतले. जानेवारी महिन्यातच केंद्र सरकारकडून त्यांना महाराष्ट्र केडर मिळाले आहे. त्यानंतर आता दोघे पती-पत्नी एकाच जिल्ह्यात आले आहेत.
दरम्यान, जालना महापालिकेचे तत्कालीन आयुक्त संतोष खांडेकर यांना लाच प्रकरणात निलंबित करण्यात आले होते. सहा महिन्यापासून हे पद रिक्त होते. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडेच या पदाचा भार सोपवण्यात आला होता. आता आयुक्त म्हणून अंजली शर्मा यांनी पदभार स्वीकारला आहे.
जालना नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर झाल्यानंतरची पहिलीच निवडणूक पार पडली. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये मोठा उत्साह आहे. अशावेळी महापालिकेचा गाडा सुरळीत हाकण्याची मोठी जबाबदारी अंजली शर्मा यांच्यावर असणार आहे.
शहराची जबाबदारी अंजली शर्मा यांच्यावर तर जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून ग्रामीण भागाचा विकास आणि सरकारी योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याची जबाबदारी कृष्णकांत कनवारिया यांच्यावर असणार आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा ओलांडल्याच्या कारणामुळे प्रलंबित आहे. त्यामुळे प्रशासक म्हणून कनवारिया यांना ग्रामीण भागावर विशेष लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे.
शहर आणि जिल्ह्याचा ग्रामीण भाग याचा सर्वांगीण विकास करणे, त्यासाठीच्या आराखड्याची अंमलबजावणी करणे शर्मा-कनवारिया हे पती पत्नी एकाच जिल्ह्यात असल्याने शक्य होणार आहे. पती-पत्नी एकीकरणाचा लाभ जालनेकरांना निश्चितच होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.