Baramati AI Centre News: बारामतीला कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय),संशोधन आणि नवकल्पनांचे जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने १९७२ मध्ये स्थापन झालेल्या विद्या प्रतिष्ठानने आता ‘बारामती इनोव्हेशन व्हॅली’ उभारण्याचा संकल्प केला आहे.
विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ही घोषणा केली. या उपक्रमाच्या माध्यमातून बारामतीला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संशोधन क्षेत्रात जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे.
विद्या प्रतिष्ठानच्या ५४ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शरद पवार यांनी ही घोषणा केली. विद्या प्रतिष्ठानच्या शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन एआयच्या माध्यमातून हा प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. हे केंद्र केवळ शिक्षणापुरते मर्यादित न राहता संशोधन, नवउद्योजकता आणि प्रत्यक्ष समस्यांवर तंत्रज्ञानाधारित उपाय शोधणारी प्रयोगशाळा म्हणून कार्य करेल, असे पवार यांनी सांगितले.
या केंद्रात एआय, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, ड्रोन, सायबर सुरक्षा, कृषी तंत्रज्ञान आणि अन्य आधुनिक तंत्रज्ञानासाठी १२ प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. दीड हजारांहून अधिक आधुनिक संगणक आणि स्वतंत्र डेटा सेंटरची सुविधाही उपलब्ध आहे. तंत्रज्ञान बसच्या माध्यमातून आतापर्यंत ६,८०० हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत एआयचे शिक्षण पोहोचविण्यात आले आहे.
एआयचा वापर शेती, आरोग्य, उद्योग, वाहतूक, ऊर्जा आणि प्रशासन अशा विविध क्षेत्रांत करण्यावर भर देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १० हजार शेतकऱ्यांपर्यंत एआय पोहोचविण्यात आले आहे. पीक नियोजन, कीड-रोगांचा अंदाज, पाण्याचे व्यवस्थापन आणि उत्पादनवाढीसाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे.
बारामती हे केंद्र आणि राज्यातील महाविद्यालये, आयटीआय, शाळा व संशोधन संस्था त्याचे सहकारी घटक असतील. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही अत्याधुनिक प्रयोगशाळांचा लाभ घेता येईल. भविष्यात ‘ग्लोबल एआय वीक’, स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर आणि उद्योगांसाठी अप्लाइड एआय लॅब सुरू करण्याचे नियोजन आहे.
जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान बारामतीत आणून त्याचा स्थानिक गरजांसाठी वापर करणे आणि यशस्वी प्रयोग महाराष्ट्रभर पोहोचविणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. ग्रामीण युवक, महिला आणि उद्योजकांना नव्या संधी उपलब्ध करून देत बारामतीला देशातील महत्त्वाचे इनोव्हेशन केंद्र बनविण्याचा निर्धार पवार यांनी व्यक्त केला.
अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांची विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळावर नियुक्ती केल्याची घोषणा देखील अँड. नीलीमा गुजर यांनी केली.
शरद पवार यांचा घसा खराब असल्याने त्यांचे भाषण संस्थेच्या सचिव अँड. नीलीमा गुजर यांनी वाचून दाखविले. उपाध्यक्ष अँड. ए.व्ही. प्रभुणे, विश्वस्त जय पवार, रेवती सुळे, किरण गुजर, डॉ. राजीव शहा, विठ्ठल मणीयार, रजिस्ट्रार श्रीश कंभोज या प्रसंगी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.