

Maharashtra Scout Guide: विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आता शाळांमध्ये स्काऊट-गाईड उपक्रमाला अधिक महत्त्व दिले जाणार आहे. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये हा उपक्रम पोहोचविण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने केले आहे. त्यानुसार सुमारे १ लाख ८ हजार शाळांमधील २ कोटी १० लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वक्षमता, शिस्त, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकी विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.
स्काऊट-गाईडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष कृतीतून विविध जीवनमूल्ये शिकविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सध्या राज्यातील जवळपास ३० हजार शाळांमधील १७ लाख ३३ हजार विद्यार्थी या प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत. आता या उपक्रमाची व्याप्ती वाढवून अधिकाधिक विद्यार्थ्यांना त्यात सहभागी करून घेण्याची तयारी सुरू आहे.
या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी दादाजी भुसे यांनी बैठक घेतली. विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच संघभावना, शिस्त आणि देशाप्रती कर्तव्याची जाणीव व्हावी, यासाठी शाळांमध्ये स्काऊट-गाईडचे उपक्रम प्रभावीपणे राबविण्याची भूमिका या बैठकीत मांडण्यात आली.
प्रशिक्षणासाठी शाळांमधील ‘आनंददायी शनिवार’ या उपक्रमाचा आधार घेतला जाणार आहे. आठवड्यातून दोन तासिका स्काऊट-गाईडसाठी राखून ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या वेळेत परेड, संचलन आणि देशभक्तिपर गीतांवर आधारित कवायती घेण्याचे नियोजन आहे.
या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शारीरिक हालचालींची सवय लागण्याबरोबरच सामूहिक सहभागाचे महत्त्व समजण्यास मदत होईल. शिस्तबद्ध वर्तन, एकमेकांना सहकार्य करण्याची वृत्ती आणि देशाबद्दल अभिमान निर्माण करणे, हेही या प्रशिक्षणाचे उद्दिष्ट आहे.
शाळांमध्ये स्काऊट-गाईडचे प्रशिक्षण योग्य पद्धतीने घेण्यासाठी शिक्षकांना तयार करण्यावरही विभागाने भर दिला आहे. त्यासाठी तालुकास्तरावर सात दिवसांचे प्रशिक्षण आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रशिक्षणानंतर शिक्षक विद्यार्थ्यांना उपक्रमातील विविध कृती आणि कौशल्यांचे मार्गदर्शन करू शकतील.
दरम्यान, स्काऊट-गाईडमध्ये प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्तरावर अधिक प्रोत्साहन देण्याचा प्रस्तावही चर्चेत आला आहे. सध्या राज्य पुरस्कार मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन, तर राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांना दहा गुण दिले जातात. या गुणांमध्ये वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यास मंत्री भुसे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे. मात्र, गुणांमध्ये नेमकी किती वाढ होणार आणि नवीन तरतूद कधी लागू होणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या बैठकीला प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह आणि एनसीईआरटीचे संचालक मंगेश जोशी ऑनलाइन उपस्थित होते. तसेच उपसचिव तुषार महाजन, स्काऊट-गाईडचे सहायक राज्य सचिव रमेश जाधव आणि विभागातील अन्य अधिकारी सहभागी झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.