Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Ajit Pawar News : निवडणूक अधिकाऱ्यांकडून अजित पवारांना क्लीन चिट

Rajanand More

Pune News : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उमेदवारांसह विविध पक्षाच्या नेत्यांकडून आश्वासनांचा पाऊस पाडला जात आहे. आपल्या उमेदवाराला मतदान केले तरच निधी देऊ, अशी विधानेही काही नेत्यांकडून केली जात आहेत.

असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीतील एका प्रचार सभेत केले होते. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने त्यांची तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती. या तक्रारीवर अधिकाऱ्यांनी अजित पवारांना क्लीन चिट दिली आहे.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या (Baramati Lok Sabha Constituency) निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी गुरुवारी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांबाबतचा अहवाल सादर केला आहे. पवारांनी आचारसंहितेचा भंग केला नसल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

अजित पवारांनी बारामतीतील प्रचार सभेत म्हटले होते की, ‘तुम्हाला हव्या असलेल्या निधीसाठी आम्ही मदत करू. पण आम्ही तर निधी देणार असू, तर तुम्हीही आमच्या उमेदवारासमोरील बटन दाबावे, अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे निधी देताना आम्हालाही बरं वाटेल.’ यावरून निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी म्हणाल्या, तक्रार आल्यानंतर आम्ही चौकशी केली. त्यानुसार अजित पवारांना नोटीस पाठवली होती. त्यांनी दिलेल्या उत्तरात हे काही अंश सत्य असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे त्या विधानाबाबतचा व्हिडिओ पाहिला. त्यानंतर प्राथमिकदृष्ट्या त्यांनी आचारसंहिताचा भंग केला नसल्याचे आढळून आले.

मतदान करण्याबाबत अजित पवारांनी कोणत्याही उमेदवाराचे नाव घेतलेले नाही. बटन दाबा, असे ते म्हणताना दिसत आहेत. त्यानुसार मी माझा अहवाल महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. संबंधित प्रचार सभेसाठी आधी परवानगी घेतली होती, असे द्विवेदी यांनी सांगतल्याचे ‘एएनआय’च्या वृत्ता म्हटले आहे.

दरम्यान, बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यामध्ये लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच पवार कुटुंबीय एकमेकांविरोधात उभे ठाकले आहे. त्यामुळ बारामतीमधील लढतीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT