Pune News : बारामती लोकसभा मतदारसंघात आज निवडणुकीसाठी मतदान होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अध्यक्ष अजित पवार आणि महायुतीच्या लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज बारामती येथील काटेवाडी येथे मतदान केले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भोरमध्ये पैसे वाटपाचा केलेल्या आरोपांवर प्रतिक्रीया दिली आहे.
अजित पवार म्हणाले, "मी वारंवार सांगत आहे की, ही निवडणूक गावकीची भावकीची नाही. तरी देखील समोरच्या लोकांनी कुटुंबातील काही लोक त्यांच्या सोबत आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पवार कुटुंबामध्ये वयाने सर्वात ज्येष्ठ या आशाताई पवार या आहेत. आज माझी आई माझ्यासोबत आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार पुढे म्हणाले, "सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार म्हणून सर्वच पक्षांनी त्यांचा चांगला प्रचार केला आहे. या प्रचारादरम्यान माझ्यावरती मोठ्या प्रमाणात आरोपांचा धुरळा उडवण्यात आला. मात्र मी त्याला महत्त्व दिलं नाही. विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवायची हे पूर्वीपासून ठरवलं होतं आणि विकासाच्या मुद्द्यावर तीच ही निवडणूक मी लढवली. बारामतीमध्ये मी केलेला विकास आणि देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे असलेले काम, यामुळे जनता आमच्यावरती विश्वास दाखवेल आणि केंद्राचा जास्तीत जास्त निधी बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये आणण्यासाठी आमच्या पाठीशी उभे राहील, असा विश्वास अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
भोरमध्ये अजित पवार गटाकडून पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे. त्याबाबतचे व्हिडिओ त्यांनी एक्स प्लॅटफॉर्म वरती शेअर केले आहेत. यावरती बोलताना अजित पवार म्हणाले, "अशा प्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोग सक्षम आहे. मी आतापर्यंत सात विधानसभेच्या आणि एक लोकसभेची निवडणूक लढली असून, असे प्रकार कधी केले नाहीत. कारण नसताना विरोधकांचे बगलबच्चे, असे आरोप माझ्यावर करत आलेले आहेत. त्याला फार महत्त्व देत नाही. यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाचे स्कॉड असतात, पोलिस असतात, निरीक्षक असतात तरीदेखील ते आमच्यावरती आरोप करत आहेत. तसेच आरोप मी देखील त्यांच्यावरती करू शकतो. त्यांनी ही निवडणूक योग्य प्रकारे हाताळली नाही,"असं अजित पवार म्हणाले.
यावेळी पत्रकारांना प्रतिप्रश्न विचारत अजित पवार म्हणाले, "तुम्ही स्वतः बँक उघडी असल्याचं पाहिलं आहे का? आणि तो व्हिडिओ त्याच वेळेचा आहे का? याची खातरजमा केलेली आहे का ? असा सवाल करत त्यांनी त्या व्हिडिओचा विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. तसेच रोहित पवारांवर पलटवार करताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, "समोरून जो आरोप करत आहे. त्याच्यावरती परिणाम झालेला आहे. त्यामुळे मी त्या आरोपांना जास्त महत्त्व देत नाही."
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.