Baramati Political News : निवडणूक म्हटले की प्रचाराची धामधूम आलीच. त्यासाठी मोठे मनुष्यबळही लागते. ते सांभाळण्यासाठी जेवणावळ्या, पैसे देणे आलेच. मात्र दिवसभर प्रचार करून पैसे मिळाले नाहीत, एक वेळेचे जेवणही मिळाले नाही, तर तेच लोक संबंधित पक्षाचा जाहीरपणे 'उद्धार' केल्याशिवाय राहत नाहीत. असाच काहीसा प्रकार बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाबाबत घडला आहे.
एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार आपला उमेदवार निवडून येण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. दुसरीकडे मात्र पदाधिकार्यांच्या चुकांमुळे पक्षाला लाजिरवाण्या प्रकाराला सामोरे जावे लागत आहे. इंदापूर तालुक्यात गुरुवारी (ता. 2) अजित पवारांच्या एका पाठोपाठ एक अशा तीन सभा झाल्या. त्या आधीच बुधवारी (ता.1) रात्री 'घड्याळा'च्या प्रचारासाठी आणलेल्या लोकांचा अजित पवार गटाविरोधात उद्रेक पाहायला मिळाला.
इंदापूर तालुक्यात महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवारांच्या प्रचार शिगेला पोहचला आहे. शहरात बुधवारी माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची जाहीर सभा होती. तसेच तालुक्यातील कळस, निमगाव केतकी परिसरातील काही महिलांसह पुरुषांना दुपारी दोन वाजेपर्यंत प्रचारासाठी शहरात आणले होते. यात ज्येष्ठ मंडळींचाही समावेश होता. त्यांना 500 रुपये रोज ठरला होता. तर या लोकांना घेऊन येणार्या वाहनांना तीन हजार रुपये असा दर ठरवण्यात आला होता. संबंधितांच्या जेवणाची सोय करण्यात आल्याचेही बोलले जात होते.
या लोकांनी शहरात दारोदार जात प्रचार केला. दुपारी दोन नंतरही रात्री उशिरापर्यंत त्यांनी काम केले. या वेळेत मात्र त्यांना सकाळी एकदाच एकएक वडापाव देण्यात आला. त्यानंतर त्यांना दिवसभर जेवण दिले नाही. रोजगाराचे ठरलेली रक्कमही दिली नाही. दिवसभर उपाशी राहिल्याने वृद्ध मंडळींना त्रास झाला. आजारी व्यक्तींच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या होत्या. दिवसभर घराबाहेर असल्याने काही लोकांच्या कुटुंबीय काळजीत पडले होते. इंदापुरातील 'घड्याळ्या'च्या प्रचारातील या सर्व गोंधळाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
दरम्यान, ज्या वेळी लोकांनी पैशांची मागणी केली, त्यावेळी मात्र तुम्ही दुसर्याच पक्षाचे आहात, असे म्हणून संबंधित पदाधिकार्यांनी त्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र या लोकांचा उद्रेक झाला. त्यांनी आपण दिवसभर घड्याळासाठी प्रचार केल्याचा फोटो, व्हिडिओ पदाधिकार्यांना दाखवले. त्यानंतर रात्री उशिरा अजित पवार गटाच्या मोठ्या पदाधिकार्याने यात मध्यस्थी करून लोकांची देणी मिटवून हे प्रकरण वाढू नये याची काळजी घेतल्याची माहिती आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या प्रकराबाबत सरकारनाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना चारवेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. तर या प्रकरणी व्हायरल झालेल्या व्हिडिओंबाबत अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी रोहित पवारांवर टीका केली आहे. रोहित पवारांनींच हे व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप मिटकरींनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.