Dattatray Bharne, Ankita Patil-Thackeray Sarkarnama
पुणे

Ankita Patil-Thackeray : सुळेंच्या खांद्यावरून अंकिता पाटलांचा भरणेंवर निशाणा; म्हणाल्या, 'जैसी करनी...'

Sunil Balasaheb Dhumal

Baramati Political News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर इंदापूरचे आमदार अजित पवार गटात सहभागी झाले. त्यानंतर ते शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांवर विविध मार्गांनी दबाव आणत असल्याचा आरोप होत आहे. याचा खासदार सुप्रिया सुळेंनी इंदापुरात जाऊन सडेतोड समाचार घेतला आहे. तुमचा कार्यक्रम आता नाही तर विधानसभेत होणार, असा इशाराच सुळेंनी नाव न घेता आमदार भरणेंना दिला आहे. आता तोच व्हिडिओ पोस्ट करत भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील-ठाकरेंनी भरणेंवर निशाणा साधला आहे. Ankita Patil-Thackeray

इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्याला महाविकास आघाडीतील खासदार संजय राऊत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आदी नेते उपस्थित होते. या वेळी सुप्रिया सुळेंनी भरणेंवर सडकून टीका केली.

सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, शरद पवारांच्या सभेला जाऊ नका, अशी धमकी आमच्या कार्यकर्त्यांना देण्यात येत आहे. मला त्यांना सांगायचंय, हा इंदापूर तालुका आहे. येथे शरद पवारांवर प्रेम करणारी लोकांची संख्या जास्त आहे. ते तुमच्या धमक्यांना घाबरणार नाहीत. आता तुम्ही तुमचं बघा. कारण कार्यक्रम येथे नाहीतर 'करेक्ट कार्यक्रम' विधानसभेत तुमचा होणार आहे," असा इशारा सुळेंनी आमदार भरणेंना दिला.

आमदार भरणे यांच्यावर सुळेंनी केलेल्या टीकेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो व्हिडिओ अंकिता पाटील यांनी ट्विट केला आहे. तसेच त्याला 'जैसी करनी... वैसी "भरणे"...' अशी कॅप्शन देत भरणेंना विधानसभेत धूळ चारण्याचा अप्रत्यक्षपणे इशाराच दिला आहे. अंकित पाटलांनी (Ankita Patil) सुळेंचा व्हिडिओ ट्विट केल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीतील नेते आमनेसामने ठाकले आहेत. बारामतीतून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि खासदार सुळे यांच्यात लढत होण्याची चर्चा आहे. त्यावर अंकिता पाटलांनी आम्हाला विधानसभेचा शब्द द्यावा, नंतरच लोकसभेचे काम करू, असे आव्हान अजित पवारांना दिले होते. तर माजी मंत्री विजय शिवतारेंनीही पवारांचा बदला घेण्याची दुर्मिळ संधी असल्याचे विधान केले आहे.

बारामतीतील महायुतीतील बेबनावावर वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असे म्हणत अजित पवारांनी इंदापूर, पुरंदरमध्ये प्रचाराची राळ उठवली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटलांना (Harshvardhan Patil) मोठे करण्याची जबाबदारी भाजपची आहे. त्यांचे सर्व प्रश्न सोडवले आहेत, असे स्पष्ट करत पाटलांमागे भाजपची सर्व ताकद असल्याचे स्पष्ट केले. यानंतर अंकिता यांनी सुळेंचा भरणे यांच्यावर केलेल्या टीकेच व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामुळे महायुतीत बारामतीवरून आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात झाली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT