Sharad Pawar News Sarkarnama
पुणे

Sharad Pawar News: पाणी राजकारण पेटवणार; दुष्काळावरून पवार सत्ताधाऱ्यांना घेरणार

Sudesh Mitkar

Pune News: लोकसभा निवडणुकीचे (Baramati Lok Sabha Election 2024) वातावरण आता तापू लागले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचाराची पहिली फेरी सुरू आहे. अशातच मतदारसंघामध्ये दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये दुष्काळाचा मुद्दा ऐरणीवर राहणार असल्याचे चित्र आहे.

हाच धागा पकडत महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी दुष्काळाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे बारामती आणि पुरंदर तालुक्यांतील दुष्काळी गावाच्या दौऱ्यावर निघाले आहेत. त्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीत पाणी प्रश्न राजकारण पेटवणार हे निश्चित दिसते.

लोकसभेच्या निवडणुका ऐन उन्हाळ्यात होत आहेत. त्यामुळे प्रचार करताना उमेदवारांना मोठी कसरत करावी लागत आहे. उन्हामुळे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते हैराण झाले आहेत, तर दुसरीकडे यंदा पाऊस कमी झाल्याने राज्यभरामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावे ही टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती, पुरंदर, दौंड, इंदापूर या तालुक्यांमधील बहुतांश भाग हा नेहमीच दुष्काळाचा सामना करत आला आहे. या भागामध्ये पाणी प्रश्न हा कळीचा मुद्दा राहिला आहे. हाच मुद्दा आता या लोकसभा निवडणुकीत गाजणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार असलेला खासदार सुप्रिया सुळे या वारंवार बारामती लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी गावांना भेट देत आहेत.

राज्य सरकार या दुष्काळामध्ये नागरिकांपर्यंत पोहोचण्यास कमी पडत असल्याचं वारंवार टीका करत आहेत, तर आज शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघातील दुष्काळ दौऱ्याला निघाले आहेत. ते आज पुरंदर आणि बारामती तालुक्यांतील दुष्काळी गावांचा दौरा करणार आहेत. या गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन समस्या जाणून घेणार आहेत. त्यानंतर सुपे येथे त्यांची सभादेखील होणार आहे. त्यामुळे या सभेच्या माध्यमातून दुष्काळाच्या प्रश्नावरून शरद पवार सत्ताधाऱ्यांना घेरणार असल्याची माहिती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकीकडे शरद पवार पुरंदर तालुक्यातील गावांमध्ये दुष्काळी दौऱ्यावर असताना दुसरीकडे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यादेखील पुरंदर तालुक्यातील गावांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यादेखील स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. सध्या बारामती मतदारसंघातील दुष्काळाची भीषण परिस्थिती बघता हाच मुद्दा लोकसभा निवडणुकीमध्ये प्रमुख प्रचाराचा मुद्दा राहणार असल्याचे बोलले जाते.

बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दुष्काळाचा प्रश्न ज्याप्रकारे ऐरणीवर आहे, त्याचप्रमाणे पुणे शहरातदेखील पाणीटंचाईचा प्रश्नदेखील भेडसावत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध असल्याने लवकरच पुणेकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे विरोधकांनी आत्तापासूनच भाजपला या पाणी प्रश्नाच्या मुद्द्यावरून टीका करण्यात सुरुवात केली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये पाणी राजकारण पेटवणार हे मात्र निश्चित आहे.

Edited by: Mangesh Mahale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT