Supriya Sule Sarkarnama
पुणे

Baramati Lok Sabha Constituency: उत्कृष्ट संसदपटू अशी स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या सुप्रिया सुळे

Sachin Waghmare

Lok Sabha Election 2024 : 'बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती' हे समीकरण राज्यातील जनतेच्या मनात आधीपासूनच पक्के आहे. आता अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. दिग्गज नेते पक्ष सोडून जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार मात्र खंबीरपणे उभे आहेत. दुसरीकडे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत खासदारकीची चौथी टर्म पूर्ण करण्यासाठी त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे सरसावल्या आहेत.

महाराष्ट्राचे राजकारण शरद पवारांभोवती कायम फिरत असते. संसदीय राजकारणात पवार 50 वर्षांपेक्षा जास्त वर्षांपासून सक्रिय आहेत. सामान्य कार्यकर्ता ते मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि लोकमान्य नेता हा त्यांचा प्रवास अतिशय लक्षवेधी आहे. प्रशासनावर घट्ट पकड असलेला नेता अशी शरद पवारांची ख्याती आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या सावलीप्रमाणे वावरत असलेल्या कन्या सुप्रिया सुळे या देखील पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत आहेत.

पुणे जिल्ह्याच्या राजकारणावर गेल्या पाच दशकांपासून पवार कुटुंबाची पकड कायम आहे. त्यामुळेच तळागाळातील अनेक गरीब व जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन बारामती लोकसभा मतदारसंघातून हॅटट्रिक करीत त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळेंनी त्यांचा वैचारिक वारसा जपला आहे. विविध प्रश्न लोकसभेत पोटतिडकीने मांडत, सर्वसामन्यांना न्याय मिळवून देण्याची घेतलेल्या भूमिकेमुळे दिवसेंदिवस त्यांचा राजकीय आलेख उंचावत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जनतेच्या हिताचे मुद्दे संसदेत मांडण्यापूर्वी ते नेहमीच समजावून घेण्यास त्या प्राधान्य देतात. त्या संदर्भातील आकडेवारी त्या स्वतः शोधून काढतात. लाखो खासगी कर्मचाऱ्यांना दिलासा देणाऱ्या 'राईट टू डिस्कनेक्ट' या सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडलेल्या खासगी विधेयकाची देशभरात चर्चा आहे. त्यांच्यामुळे प्रश्न सुटून आपणास न्याय मिळू शकतो, ही भावना जनमाणसांत आहे. त्यांचा संसदेतील वावर अतिशय प्रभावी आहे. त्यामुळे त्या उत्कृष्ट संसदपटू म्हणून राष्ट्रीय स्तरावर ओळखल्या जातात.

17 व्या लोकसभेत 2019 पासून आतापर्यंत खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वाधिक 711 गुणांक मिळवून देशातील सर्वोत्कृष्ट खासदार होण्याचा मान मिळवला आहे. संसदेच्या 2019 पासून आजवरच्या एकूण 229 चर्चासत्रांत सहभागी होत त्यांनी तब्बल 546 प्रश्न विचारले आहेत. इतकेच नाही, तर त्यांनी या कामगिरीमध्ये 13 खासगी विधेयके मांडत देशातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्रथमच पटलावर आणत त्यावर कायदा व्हावा अशा सूचनाही मांडल्या आहेत. संसदेत खासदार सुप्रिया सुळे यांची 93 टक्के उपस्थिती आहे. याची टक्केवारी पाहता राष्ट्रीय पातळीवर 79 टक्के तर राज्य पातळीवर 74 टक्के इतकी होते.

चर्चासत्रात सहभागाची टक्केवारी राष्ट्रीय पातळीवर 41.5 तर राज्य पातळीवर 51.3 खासगी विधेयके राष्ट्रीय पातळीवर 1.2 तर राज्य पातळीवर 2.4 इतकी आहेत. संसदेत त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सरासरी राष्ट्रीय पातळीवर 176 असून राज्य पातळीवर ती तब्बल 327 इतकी आहे. बारामती मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचा आवाज देशाच्या सर्वोच्च सभागृहापर्यंत पोहोचवणे, त्यांच्या समस्या पटलावर मांडणे, त्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे, स्थानिक पातळीपासून मंत्रालयापर्यंत आणि प्रत्यक्ष भेटीपासून संसदेत आवाज उठवण्यापर्यंत त्याचा पाठपुरावा करणे यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत.

नाव (Name)

सुप्रिया सदानंद सुळे

जन्मतारीख (Birth Date)

30 जून 1969

शिक्षण (Education)

बी.एस्सी. (मायक्रोबायोलॉजी )

कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्या मातोश्री शारदाबाई या शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या होत्या. शरद पवार यांना राजकारणाचे बाळकडू मातोश्री शारदाबाई यांच्याकडूनच मिळाले. गोविंद पवार आणि शारदाबाई पवार यांना सात मुलगे आणि सात मुली. त्यातले फक्त शरद पवारच हेच सक्रिय राजकारणात उतरले. बाकीच्यांनी शेती, वकिली, शिक्षण, उद्योग अशा त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात शिखर गाठले. शरद पवार यांच्यानंतर पवार कुटुंबातून अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी राजकारणात पाऊल ठेवले. सुप्रिया सुळे थोड्या उशिरा राजकारणात उतरल्या.

शरद पवार आणि प्रतिभा पवार यांच्या पोटी सुप्रिया सुळे यांचा जन्म 30 जून 1969 रोजी पुण्यात झाला. त्यांचे शिक्षण मुंबईतील जय हिंद कॉलेजमध्ये झाले. त्यांनी सूक्ष्मजीवशास्त्र विषयावर बीएस्सी केली. 4 मार्च 1991 रोजी सदानंद भालचंद्र सुळे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना मुलगा विजय आणि मुलगी रेवती ही दोन अपत्ये आहेत. शरद पवार यांचे बंधू आप्पासाहेब पवारांचे नातू रोहित राजेंद्र पवार हे आमदार आहेत. अजित पवार यांना पार्थ आणि जय अशी दोन मुले.

त्यातल्या पार्थ यांनी लोकसभेची मागील निवडणूक मावळमधून लढवली. पण, त्यांचा पराभव झाला. पवार कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी ही काँग्रेसशी संबंधित आहे. सुप्रिया सुळे यांनी लग्नानंतर कॅलिफोर्नियामध्ये काही काळ घालवला, तेथे त्यांनी यूसी बर्कलेमध्ये जल प्रदूषणाचा अभ्यास केला. त्यानंतर त्या इंडोनेशिया आणि सिंगापूरला गेल्या होत्या. त्या नंतर त्या मुंबईला परतल्या.

नोकरी किंवा व्यवसाय काय? (Service/Business)

शेती. यासह गेल्या दीड दशकापासून अधिककाळ राजकारण व समाजकारणात त्यांचा सक्रिय सहभाग आहे.

लोकसभा मतदारसंघ कोणता? (Lok Sabha Constituency)

बारामती

राजकीय पक्ष कोणता? (Political Party Affiliation)

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey)

सुप्रिया सुळे यांनी 2006 मध्ये राजकारणात प्रवेश केला. महाराष्ट्रातून पाहिल्यांदा त्या राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेल्या. 2009 मध्ये प्रथमच त्या बारामती लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्या. त्यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्या दुसऱ्यांदा विजयी झाल्या. 2018 मध्ये लोकसभेत त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या म्हणून निवड करण्यात आली.

2019 मध्ये तिसऱ्यांदा त्या बारामती लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्या. 10 जून 2023 रोजी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. लोकसभेच्या सदस्य म्हणून सुप्रिया सुळे यांना त्यांच्या संसदीय कार्यासाठी ओळखले जाते. लोकसभेतील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खासदारांपैकी एक म्हणून त्या उदयास आल्या आहेत.

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency)

गेल्या दीड दशकापासून अधिक काळ राजकारण व समाजकारणात त्यांचा सहभाग आहे. स्त्री भ्रूणहत्येविरोधातील राज्यस्तरीय मोहिमेचे नेतृत्व त्यांनी केले. या मोहिमेत पदयात्रा, महाविद्यालयीन कार्यक्रम, स्पर्धा आदींचा समावेश होता. 2012 मध्ये सुळे यांच्या नेतृत्वाखाली तरुणींना राजकारणात व्यासपीठ देण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेस या संघटनेची स्थापना करण्यात आली. स्त्रीभ्रूणहत्या, हुंडा पद्धतीला विरोध, महिला सक्षमीकरणावर भर देणारे अनेक मोर्चे त्यांनी राज्यभरात काढले. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नींना स्वावलंबी करणारा उमेद हा लक्षवेधी उपक्रम राबविला.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नींसाठी मोफत आरोग्य सेवा, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणाची सोय, एकल महिलांच्या विविध प्रश्नांसाठी त्या कार्यरत आहेत, ट्रान्सजेंडरच्या विविध प्रश्नांसाठी कार्यरत, प्रत्येक घटकासाठी महामंडळ सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने विद्यार्थी व खेळाडूंना मदत केली. बारामती लोकसभा मतदारसंघांतील 20 हजारांपेक्षा अधिक नागरिकांना त्यांनी आतापर्यंत कृत्रिम अवयव व साधनांचे मोफत वाटप, कर्ण दोष असणाऱ्या 50 हजारांपेक्षा जास्त नागरिकांना मोफत डिजिटल श्रवणयंत्रे दिली आहेत.

एकाच दिवशी अशी सहा हजार यंत्रे बसविण्यात आली होती. एका तासात 4 हजार 846 श्रवण यंत्रे बसवण्याचा जागतिक विक्रम त्यांनी केला. त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने नोंद घेतली आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या (मुंबई) त्या कार्याध्यक्ष, राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या अध्यक्ष, मौलाना आझाद एज्युकेशनल ट्रस्टच्या उपाध्यक्ष, नेहरू सेंटरच्या (मुंबई) विश्वस्त, रयत शिक्षण संस्थेच्या सदस्य, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, विद्या प्रतिष्ठान (बारामती), अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या (बारामती) विश्वस्त म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना ऑल लेडीज लीगने मुंबई वुमन ऑफ द डिकेड अचिव्हर्स अवॉर्ड देऊन गौरविले आहे. सलग दोन वेळा संसद महारत्न पुरस्काराने सन्मानित, संसद विशिष्टरत्न पुरस्कार व सलग सात वर्षे संसदरत्न पुरस्काराने सन्मान, सलग तीन वर्षे नारीशक्ती फेम इंडियाचा आदिशक्ती उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार, देवी पुरस्कार, भारत अस्मिता अवॉर्ड, युनिसेफचा पार्लमेंटरी अवॉर्ड फॉर चिल्ड्रन (2018) या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

2019 मधील निवडणूक लढविली होती का ? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 Lok Sabha Election)

सुप्रिया सुळे यांनी 2019 मधील निवडणूक लढविली होती. त्या निवडणुकीत त्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या उमेदवार आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांचा एक लाख 56 हजार मतांच्या फरकाने पराभव केला. हा पराभव करत त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून हॅटट्रिक केली. सुप्रिया सुळे यांना 6 लाख 86 हजार 714 इतकी तर कांचन कुल यांना 5 लाख 30 हजार 940 इतकी मते मिळाली.

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती ? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election)

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. त्यांनी सर्व कामांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला आहे. येथील नागरिकांच्या प्रश्नांवर नेहमीच लोकसभेत आवाज उठवतात. त्याशिवाय नागरी समस्या व विविध प्रश्न लोकसभेत पोटतिडकीने मांडत, सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याची त्यांची भूमिका सर्वसामान्यांना भावते. यामुळे त्यांना या ठिकाणी विजय मिळवणे अवघड जात नाही. त्याशिवाय बारामती मतदारसंघ आतापर्यंत पवार कुटुंबाचा बाल्लेकिल्ला राहिला आहे. या मतदारसंघात भाजपला तगडा उमेदवार मिळत नसल्याने विजय मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency)

मतदारसंघात प्रत्येकाच्या मदतीला जाणाऱ्या खासदार अशी त्यांची ओळख आहे. त्याचा त्यांना मोठा फायदा झाला आहे. त्या सतत काम करीत असल्याने प्रत्येकाच्या त्या संपर्कात असतात. मतदारसंघातील विकासकामांवर त्यांचे बारकाईने लक्ष असते. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या ते नियमित बैठका घेतात. मतदारसंघातील विविध सहकारी संस्था, कारखान्याच्या कारभाराचा नियमित आढावा ते घेतात. नेहमी कार्यकर्त्यांच्या व महिलांच्या गराड्यात त्या असतात. मतदारसंघातील जुन्या-जाणत्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना व युवा मंडळींना व महिलांना त्या नावानिशी ओळखतात. त्यांचा जनसंपर्क मोठा आहे.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles)

सोशल मीडियावर त्या सक्रिय असतात. सुळे यांचा सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच जनसंपर्क वाढवण्यावर भर असतो. त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून त्यांनी केलेली विकासकामे मतदारसंघातील जनतेपर्यंत पोहोचवली जातात. त्याशिवाय त्यांच्या कार्याची माहिती देणारी वेबसाईट आहे. त्यावरून सर्व माहिती उपलब्ध असते. पक्षाची ध्येयधोरणे, भाषणे, मेळावे याची माहिती ते सोशल मीडियाच्या सर्वच प्लॅटफॉर्मवरून कार्यकर्त्यांना देत असतात.

याशिवाय बारामती मतदारसंघातील व पुणे शहरातील पक्षीय घडामोडी, कार्यक्रमांमधील सहभाग यांची माहिती, छायाचित्रे दररोज त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट केल्या जातात. पक्षातील प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ता यांच्याशी त्यांची वैयक्तिक ओळख आहे. त्यामुळे त्याचा त्यांना फायदा होतो. मतदारसंघात सर्वांच्या कामाला तत्पर धावणाऱ्या खासदार अशी असलेली ओळख व नागरिकांशी मजबूत संबंध असलेल्या नेत्या अशी ओळख असल्याने सार्वजनिक क्षेत्रात काम करताना त्यांना त्याचा फायदा होतो.

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate)

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आल्यावर म्हणाले होते की, राष्ट्रवादी काँग्रेस ही नॅचरली करप्ट पार्टी आहे. त्यावेळेस सिंचन आणि बॅंक भ्रष्टाचाराचा मुद्दा त्यांनी मांडला होता. माझी सरकारला आग्रहाची विनंती आहे की, याची तातडीने चौकशी करावी. या चौकशीला आमचे पूर्ण समर्थन असेल, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी भाजपची कोंडी केली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांचे नाव घेतले.

हेडगेवार यांचे नाव वापरून मते मिळत नाहीत म्हणून त्यांना यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावावा लागतो आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे, असे म्हणत त्यांनी टीका केली होती. सध्या देशात आणीबाणी सुरू झाली आहे. ही आणीबाणी मोडीत काढली पाहिजे. संविधान वाचवले पाहिजे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिशा दिली. त्यांनी तयार केलेल्या संविधानाला वाचवण्याची जबाबदारी सरकारची आहे. संविधानाच्या चौकटीत राहून सरकारने काम केल पाहिजे. शेतकरी विरोधी सरकारला त्याची जागा दाखवायची वेळ आली आहे. त्यामुळे हा शेतकरी मोर्चा आम्ही काढतोय,असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.

राजकीय गुरु कोण? (Political Godfather/Guru)

जेष्ठ नेते शरद पवार

सकारात्मक मुद्दे (Positive Points about candidate)

बारामती हा मतदारसंघ गेल्या पाच दशकांपासून शरद पवार यांचा बालेकिल्ला राहिला आहे. येथे पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्याशिवाय, गेल्या 15 वर्षांपासून अधिक काळ सुप्रिया सुळे तिथे खासदार आहेत. यामुळे त्यांचे कामही तितकेच आहे. शिवाय, पक्षात दोन गट झाल्यानंतर शरद पवारांच्या बाजूने सहानुभूती आहे. यामुळे पवारांची पुण्याई आणि तीन टर्म खासदार असल्याने सुप्रिया सुळे यांच्यासमोर खूप मोठे आव्हान या निवडणुकीत राहील असे वातावरण नाही. सुप्रिया सुळे या तीन वेळा बारामतीमधून खासदार झाल्या आहेत. त्यांना सात वेळा संसद रत्न पुरस्कार मिळाला आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रश्न असतील या प्रश्नांवर खासदार म्हणून त्यांनी चांगल्या पद्धतीने त्यांची भूमिका संसदेमध्ये मांडली आहे.

बारामती मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडविण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. लोकसभेत त्या मतदारसंघातील प्रश्न पोटतिडकीने मांडत असतात. त्यांच्यामुळे बारामती मतदारसंघातील अनेक महत्वाचे प्रश्न मार्गी लागले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातून जाणारे विविध राष्ट्रीय महामार्ग, प्रलंबित तसेच सुरू असलेली कामे लवकर पूर्ण करावीत, या प्रश्नवरून आवाज उठवला. बारामती लोकसभा मतदारसंघातील पालखी मार्ग आणि लोणंद (सातारा) या दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा नीरा-बारामती हा रस्ता राष्ट्रीय रस्ते महामंडळाकडे वर्ग करून तो राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात यावा, यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. बारामतीहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी पुण्याहून सुटणाऱ्या डेक्कन किंवा प्रगती एक्स्प्रेसपैकी एक रेल्वेगाडी बारामतीहून सोडावी असा त्यांचा रेल्वे प्रशासनाकडे आग्रह आहे.

मतदारसंघातील रस्त्यांवरील खड्डयांसोबत सेल्फी काढून सरकारला वारंवार जाणीव करुन देऊनही खड्डे बुजविले जात नाहीत, या खड्डयांमुळे जर कोणाचा बळी गेला तर त्याची जबाबदारी राज्य शासनावर असेल असा इशारा त्यानी दिल्याने मतदार संघातील रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. बारामती तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जलसंधारणांची कामे झाली आहेत. या कामांमुळे उन्हाळ्यात भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या कायमची सुटण्यास मदत होणार आहे. बारामती येथे केंद्र सरकारने शंभर बेडचे ईएसआयसी रुग्णालय मंजूर केले आहे. त्याचा बारामतीसह दौंड, जेजुरी, इंदापूर, फलटण, माढा आणि श्रीगोंदा या औद्योगिक वसाहतींतील कामगारांना तत्काळ आरोग्यसेवा मिळणार आहे.

राज्यातील दोन प्रमुख समजल्या जाणाऱ्या जेजुरी व मोरगाव या तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या रस्त्याच्या दयनीय अवस्थेबाबत सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाइव्ह करत थेट मुख्यमंत्र्यांनाच आवाहन करीत तातडीने दुरुस्तीची मागणी केली. या रस्त्याचा प्रश्न त्यांच्यामुळे मार्गी लागला. बारामती आणि इंदापूर ही दोन मोठी शहरे. त्यापैकी बारामती तालुक्यातील पाच गावे आणि इंदापूर तालुक्यातील 22 गावांतील शेतकरी आणि नागरिकांची जमीन पालखी मार्गाच्या रुंदीकरणासाठी संपादित करण्यात येणार आहे. त्यामुळे येथील रस्त्याचा प्रश्न मिटला आहे. घरोघरी गॅस ही संकल्पना केंद्र व राज्य सरकार आता राबवत आहे.

पण गेल्या अनेक वर्षांपासून बारामती तालुक्यातील बहुतांश भागात हा विकास यापूर्वीच पोहोचला आहे. सुप्रिया सुळे यांच्यामुळे विकासाचे बारामती मॉडेल देशात प्रसिद्ध झाले आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून गावोगावी पासपोर्ट मिळवून देण्यासाठी हाती घेण्यात आलेला महत्वाकांक्षी प्रकल्प उपयुक्त ठरत आहे. बारामतीच्या पोस्ट कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या पासपोर्ट सेवा केंद्राचा फायदा मतदारसंघातील नागरिकांना होत आहे. विशेषतः पुणे व बारामती शहरातील वाहनांची संख्या वाढत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत होता. या प्रश्नाकडे लक्ष वेधत त्यांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर पहिल्यांदा निवडणूक होत आहे. पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादीचा गड असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे रणशिंग भाजपने आतापासूनच फुंकले आहे. भाजपने देशभरातील काही लोकसभा मतदारसंघांकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील बारामतीचाही समावेश आहे. भाजपला बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचा पराभव करायचा आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात विजय शिवतारे, कांचन कुल, हर्षवर्धन पाटील, पार्थ पवार यांच्या नावांची चर्चा सुरू असताना अचानक सुनेत्रा पवारांचे नाव आले आहे. मतदारसंघातील रस्त्यांवरील खडड्यांसोबत सेल्फी काढून सरकारला वारंवार जाणीव करुन देऊनही खड्डे बुजविले गेले नाहीत, यामुळे काहीशी नाराजी आहे. पुणे व बारामती शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. या प्रश्नाकडे झाले आहे. या वर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या जाणवणार आहे.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If didn’t get chance to contest Lok Sabha election what will be the consequences)

राष्ट्रवादी काँग्रेसकडे (शरद पवार गट) या मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्याशिवाय दुसरा तुल्यबळ उमेदवार सध्या तरी दिसत नाही. तीन वेळा निवडणूक लढवत त्यांनी विजयश्री खेचून आणली आहे. या मतदारसंघातील विकासकामांच्या जॊरावर त्या विजय मिळवू शकतात. त्यांनी केलेल्या कामांची संपूर्ण मतदारसंघातील नागरिकांना जाणीव आहे. त्याशिवाय संपूर्ण मतदारसंघाची त्यांना खडानखडा माहिती आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी न दिल्यास या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागू शकते. सुप्रिया सुळे यांना जरी उमेदवारी मिळाली नाही तरी त्या पक्षाविरोधात बंडखोरी करणार नाहीत. पक्षाने जर याठिकाणी दुसरा उमेदवार दिला तरी पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचे त्या पालन करतील. त्यामुळे याठिकाणी बंडखोरीची कसलीच शक्यता नाही.

(Edited By Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT