Baramati NagarParishad : बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अपेक्षेनुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला बहुमत मिळाले. या निवडणुकीमध्ये सहा जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाल्याने राष्ट्रवादीच्या गोटात काहीसे निराशेचे वातावरण होते. विजयी उमेदवारांनी जल्लोष केला, पण त्याला या सहा ठिकाणच्या पराभवाचीही किनार होती. इच्छुकांची नाराजी, अंतर्गत मतभेद, एकमेकांची जिरवण्याची जिद्द, जुने हिशेब चुकते करण्याची ईर्षा, काही ठिकाणी राष्ट्रवादीच्याच पदाधिकाऱ्यांनी पक्षाविरोधात केलेले काम, कमकुवत उमेदवार या सर्वांचा फटका सहा जागा पराभूत होण्यात राष्ट्रवादीला बसला.
नगरपरिषदेच्या 41 जागांपैकी 8 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. हाही नगरपरिषद इतिहासातील एक विक्रमच होता. राष्ट्रवादीने आपली ताकद पणाला लावली होती, तरीही सहा जागांवर त्यांना पराभव स्वीकारावा लागला. गेल्या निवडणुकीमध्ये चार जागांवर पराभव स्वीकारावा लागला होता, यंदा हा आकडा सहावर गेला. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत विरोधात असलेल्या सुनील सस्ते, विष्णूपंत चौधरी व जयसिंग देशमुख यांना राष्ट्रवादीची तिकिटे अजित पवार यांनी दिली, ते तिघेही विजयी झाले.
इतर सहा जागांवर यंदा पक्षाला अपयश आले. वरील सहा जागांचा अपवाद वगळता उर्वरित जागांवर पक्षाने यश संपादन केले. 41 पैकी आठ जागा बिनविरोध झाल्या होत्या, त्यामुळे 33 जागांसाठीच प्रत्यक्षात मतदान झाले. नगराध्यक्षपदाची निवडणूक एकतर्फी झाली. त्यात सचिन सातव यांनी घवघवीत यश संपादन केले.
शहरातील सर्वाधिक चर्चेचा प्रभाग हा 15 होता. यात ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांचे बंधू जितेंद्र गुजर विरुद्ध माजी नगराध्यक्ष सुनील पोटे यांचे चिरंजीव यशपाल पोटे, असा सामना रंगला. दोन्ही तुल्यबळ उमेदवार असल्याने येथे कोणाचा विजय होणार, याकडे सर्वांचेच लक्ष होते. यात यशपाल पोटे यांनी बाजी मारत जितेंद्र गुजर यांचा पराभव केला.
तसेच, बारामतीच्या राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा अनिता गायकवाड यांचा मनीषा संदीप बनकर यांनी पराभव केला. बनकर यांच्या समर्थकांना विजयाचा इतका विश्वास होता की मतदान संपताच त्यांनी मनीषा बनकर यांच्या विजयाचे फ्लेक्स उभारले. पक्षाध्यक्षांचा बालेकिल्ल्यातील पराभव पक्षासाठी विचार करायला लावणारा ठरणारा आहे.
नगरसेवकांची यादी जाहीर झाल्यानंतर अंतर्गत कलहाचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादीला सहन करावा लागला. मतदारांपर्यंत पोहोचूनही काही मुद्यांवर मतदारांनी आपले वजन विरोधकांच्या पारड्यात टाकल्यामुळे या पुढील काळात अंतर्गत समन्वय राखण्याच्या दृष्टीने पक्षाला आत्मपरीक्षण करावे लागणार आहे. अजित पवारांना विरोध नाही, पण त्यांच्या आजूबाजूला असलेल्या काही चेहऱ्यांविषयी नाराजी असल्याचे बोलून दाखवत काहींनी बंडांचा झेंडा हाती घेतला आणि विजयही खेचून आणला.
राष्ट्रवादीच्या विरोधात सर्वाधिक 27 जागा लढविलेल्या भाजपला खातेही उघडता आले नाही. भाजपने (BJP) आपले अस्तित्व टिकविण्याच्या दृष्टीने ही निवडणूक लढविली. पुरेशी तयारी न करता केवळ निवडणूक लढविण्याच्या उद्देशाने त्यांनी याकडे पाहिले, यात त्यांचा दारुण पराभव झाला. वरिष्ठ स्तरावरून एकही नेता बारामतीत प्रचारासाठी फिरकलाच नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षाने 15 जागांवर उमेदवार उभे केलेले होते. लग्नाच्या धामधूमीतूनही काही काळ वेळ काढून युगेंद्र पवारांनी प्रचार केला, पक्षाच्या आरती शेंडगे या विजयी झाल्याने त्यांनी नगरपरिषदेत खाते उघडले आहे. यशपाल पोटे यांनाही युगेंद्र पवार यांनी पाठिंबा दिलेला होता, तेही विजयी झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.