Baramati Maratha Protest Sarkarnama
पुणे

Baramati Maratha March : ...नाहीतर बारामतीतून दोनशेजण निवडणूक लढवतील; बारामतीकरांचा अजितदादांना इशारा

मिलिंद संगई

Pune Political News : मराठा आरक्षण देण्यास सरकार असमर्थ असेल तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेतून बाहेर पडावे, अशी मागणी सोमवारी मराठा क्रांती मोर्चाप्रसंगी अनेकांनी जाहिरपणे बोलून दाखवली. दरम्यान, या आशयाच्या घोषणाही मोर्चादरम्यान दिल्या गेल्या होत्या. यानंतर सभेत 'वेळ पडली तर बारामतीतून मराठा समाजाचे दोनशे कार्यकर्ते निवडणूक लढवतील', असा इशारा बारामतीकरांनी दिला आहे. आता मतदारांनीच केलेल्या आवाहनानंतर अजितदादा काय भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Latest Political News)

बारामतीत कडकडीत बंद पाळून सोमवारीमराठा समाजाच्यावतीने मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी सरकारचा भरलाय घडा, अजितदादा सत्तेतून बाहेर पडा, या आशायच्या घोषणांनी बारामती दणाणली होती. भिगवण चौकात मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी 'सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर, आगामी सर्व निवडणुकांवर मराठा समाज बहिष्कार घालेल. एकही मराठा मतदार मतदान करणार नाही. वेळप्रसंगी बारामतीतूनच आम्ही दोनशे कार्यकर्त्यांना निवडणुकीला उभे करु, असा थेट इशारा बारामतीतील आंदोलकांनी दिला आहे.

जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या पोलिस लाठीमारानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. बारामतीतही सोमवारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बारामती बंदची हाक देण्यात आली होती. सकाळी कसब्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापासून मोर्चा निघाला व भिगवण चौकात त्याचे सभेत रुपांतर झाले. मोर्चादरम्यान अनेक आंदोलकांनी अजित पवार यांनी आरक्षण मिळत नसेल तर सत्तेतून बाहेर पडावे, अशी तीव्र भूमिका घोषणांच्या माध्यमातून व्यक्त केली.

आरक्षणाच्या मुद्यावर सर्वच नेतेमंडळींनी मोर्चात सहभागी व्हायला हवे होते, या मागणीला पाठिंबा द्यायला हवा होता, अशी भावनाही व्यक्त केली गेली. अनेक कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत आरक्षणाच्या मागणीसाठी दिरंगाई होत असल्याबद्दल सरकारचा निषेध केला. आरक्षण द्यायला जमत नसेल तर सत्तेतून पायउतार व्हा, असाही आग्रह काहींनी केला.

दरम्यान, मराठा समाजाच्या वतीने मागितले जाणारे आरक्षण कोणावरही अन्याय करणारे नसून त्यांच्या न्याय हक्काचे आहे. कोणाचेही आरक्षण डावलून आम्ही आरक्षण मागत नाही तर आम्ही आमच्या हक्काचेच आरक्षण मागत असल्याचे या वेळी कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. यावेळी प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, तहसिलदार गणेश शिंदे निवेदन स्विकारण्यासाठी उपस्थित होते.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT