Pune News: बारामती आणि इंदापूरमधील ऊस उत्पादकांसाठी जिव्हाळ्याची असलेल्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून 18 मे रोजी मतदान होणार आहे. 19 मे रोजी कारखान्यांचे कारभारी ठरणार आहेत. निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न सुरु आहे.
या कारखान्यावर गेल्या अनेक वर्षांपासून पवार घराण्याचे वर्चस्व आहे.राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर आता हा कारखाना कोणाकडे जाणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. त्यामुळे ही निवडणूक महत्वाची आहे.कारखान्याचे विद्यमान संचालक मंडळ हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहे.
भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची दहा वर्ष रखडलेली निवडणूक जाहीर झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गेली पाच वर्षे संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाली होती, आता निवडणूक जाहीर झाल्याने बारामती-इंदापूर तालुक्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. सत्ताधारी संचालक मंडळ आणि विरोधकांमध्ये रणनीती आखली जात आहे.
परंपरागत विरोधक असलेल्या साखर संघाचे व कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांना पाठिंबा देत त्यांच्याकडेच पुढील पाच वर्षांसाठी छत्रपती कारखान्याची जबाबदारी सोपविण्याची तयारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्याची माहिती आहे.
अजित पवार व पृथ्वीराज जाचक यांच्यामध्ये शनिवारी (ता. 5) रात्री उशिरा अजितदादा यांच्या सहयोग निवासस्थानी खलबत झाली. यात अजित पवार यांनी छत्रपती कारखान्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यावर भर दिल्याची विश्वसनीय सुत्रांची माहिती आहे.
गट, तट व राजकीय चढाओढीमध्ये कारखान्याच्या सभासदांचे नुकसान होऊ नये, या उद्देशाने निवडणुकीचा खर्च व निर्माण होणारी कटूता टाळून कारखान्याच्या भल्याच्या उद्देशाने सर्वांनी एकत्रित येत वाटचाल करावी , असा विचार अजितदादांनी जाचक यांच्याकडे बोलून दाखवला. त्याला जाचक यांनीही सकारात्मकता दाखवली असल्याचे समजते.
आज (ता. 6) पृथ्वीराज जाचक यांनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय मेळाव्यामध्ये स्वतः अजितदादा सहभागी होणार आहेत. मेळाव्यात अजितदादा पृथ्वीराज जाचक यांना पाठिंबा देत त्यांच्यावरच आगामी काळात छत्रपती कारखान्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवतील अशी शक्यता नाकारता येत नाही.
अजितदादा अन् पृथ्वीराज जाचक एकत्र आल्यास छत्रपती कारखान्याची निवडणूक बिनविरोध होईल, असे जाणकार सांगतात. आज (रविवारी) दुपारी दीड वाजता होणाऱ्या मेळाव्यात अजितदादा काय भूमिका घेतील, यावर निवडणूक बिनविरोध होणार की नाही, हे ठरेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.