पिंपरी : कोल्हापूर (Kolhapur) उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक भाजपने (BJP) व त्यातही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनी प्रतिष्ठेची केली आहे. ही निवडणूक जिंकल्यास, कोल्हापूर सोडून कोथरूडला (पुणे) का यावे लागले, या सततच्या होणाऱ्या टीकेतून पाटलांची सुटका होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने सातारा, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील अनुभवी पदाधिकाऱ्यांची फौज कामाला लावली आहे. यातच कोल्हापूरात पैलवानकीचे धडे गिरवलेले भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) हे ही कोल्हापूरात दाखल झाले आहेत.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघांसारख्या राज्यभरातील चाळीस फायर ब्रॅण्ड नेत्यांची फौजही स्टार प्रचारक म्हणून कोल्हापूरच्या प्रचारात भाजपने उतरवली आहे. कोल्हापूर कनेक्शन असलेल्या नेत्यांना भाजप नेतृत्वाने आवर्जून कोल्हापूरला धाडले आहे. तेथील तालमींशी सबंध असलेले आमदार लांडगे हे दोन दिवसांपासून तालमीत आणि तेथील आपल्या मित्रपरिवारात जाऊन प्रचार करीत आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये शिक्षणसंस्था असलेले भाजपचेप्रदेश सचिव अमित गोरखे हे कोल्हापूरातील शिक्षण संस्थांत जाऊन प्रचार करीत आहेत. ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष होते. म्हणून अनुसूचित जातीच्या मतदारांकडेही ते लक्ष देत आहेत. भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे यांच्यावर प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव राहत असलेल्या मंगळवार पेठेची जबाबदार देण्यात आली आहे.
महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांच्याकडे महिला मतदारांना जोडण्याचे काम देण्यात आले आहे. तर, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे भाजपचे माजी उपमहापौर कामगार नेते केशव घोळवे हे कामगारांची मते कशी पक्षाला मिळतील हे पाहत आहेत. पिंपरी महापालिकेतील पक्षाचे माजी पक्षनेते एकनाथ पवार, नामदेव ढाके, शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस अॅड. मोरेश्वर शेडगे आदींकडे बूथची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याजोडीने ते घरटी प्रचारही करीत आहेत. गुढीपाडव्यापूर्वीच पंधरा दिवस अगोदर पिंपरी-चिंचवडमधील अनुभवी पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांची वीस जणांची टीम कोल्हापूरला प्रचारासाठी गेली होती. पाडव्याला ती शहरात परत आली. यानंतर ३ एप्रिलला ती पुन्हा कोल्हापूरला गेली आहे.
घरोघरी जाऊन भाजपलाच मतदान करा,असे सांगत आहे. तसेच स्थानिक कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही करीत आहे, असे गोरखे आणि थोरात यांनी कोल्हापूरातून 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. कोल्हापूर उत्तरचे दिवंगत आमदार काँग्रेसचे चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. तरीही काँग्रेसला सहानुभूतीच्या लाटेचा फायदा होणार नाही, असा दावा शेडगे यांनी केला आहे. जाधव यांच्याविरुद्ध भाजपनेही सत्यजित कदम यांना रिंगणात उतरवले आहे. दरम्यान, पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीतील भाजपचे प्रभारी मावळचे माजी आमदार बाळा ऊर्फ संजय भेगडे हे सुद्धा या निवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.