NCP Amol Kolhe Sarkarnama
पुणे

Shirur Lok Sabha 2024 Result : अमोल कोल्हेंच्या लीडचं गणित फिस्कटलं, कारण 'भोसरी' ठरलं!

उत्तम कुटे 

Shirur Lok Sabha Election and Bhosari Constituency News : शिरुर लोकसभा मतदारसंघातून आघाडीचे (शरद पवार राष्ट्रवादी) उमेदवार डॉ.अमोल कोल्हे हे गेल्यावेळेपेक्षा (५७ हजार) दुपटीपेक्षा जास्त लीडने (१,४१,९३८)यावेळी निवडून आले.

त्यांनी आघाडीचे शिवाजीराव आढळराव-पाटील यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव केला. त्यांच्या यशात, आढळरावांच्या अपयशात अजित पवार राष्ट्रवादी आमदारांच्या मतदारसंघाचा सिंहाचा वाटा राहिला,हे विशेष.त्यामुळे तो मोठा चर्चेचा विषय झाला.

शिरुरमधील सहापैकी चार आमदार (जुन्नरचे अतुल बेनके,आंबेगावचे दिलीप वळसे-पाटील,खेड-आळंदीचे दिलीप मोहिते पाटील,हडपसरचे चेतन तुपे) हे अजित पवार गटाचे असूनही त्यांच्या पक्षाचे उमेदवार आढळरावांचा पराभव झाला हे धक्कादायक आहे. फक्त शिरुरचे आमदार अशोक पवार हे शरद पवार समर्थक आहेत. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात कोल्हेंना लीड मिळणे स्वाभाविक होते.

पण, अजितदादांच्या वरील चार आमदारांच्या मतदारसंघातही त्यांना ते भरभक्कम मिळाल्याने तो मोठा चर्चेचा विषय झाला आहे.फक्त भोसरी या सहाव्या मतदारसंघाचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी युतीधर्म पाळून आढळरावांना नऊ हजाराचे लीड दिले. पण,ते खूपच कमी पडले. कारण बाकीच्या पाच मतदारसंघात कोल्हेंना ते मोठे मिळाल्याने भोसरीची कसर भरून काढत ते मोठ्या फरकाने विजयी झाले.

गेल्यावेळी भोसरीने आढळरावांना ३७ हजाराचे मताधिक्य दिले होते.त्याजोडीने ह़़डपसरमध्येही त्यांना ते १७ हजाराचे मिळाले होते. यावेळी भोसरीतून एक लाखाचे मताधिक्य देण्याचा निर्धार महेशदादांनी केला होता.त्यासाठी त्यांनी मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याकरिता घड्याळाला (आढळऱाव) मत द्या,असे आवाहन केले होते.

पण,ते भोसरीकरांना रुचले नाही. त्यामुळे एक लाख सोडा,गेल्यावेळेपेक्षाही कमी म्हणजे अवघे नऊ हजाराचे मताधिक्य आढळरावांना भोसरीत मिळाले. पण,त्यामुळे दोन लाखाच्या लीडने निवडून येऊ या कोल्हेंच्या दाव्याला ब्रेक लागला.भोसरीतून त्यांना भरघोस मते व मताधिक्य न मिळाल्याने त्यांचे एकूण लीड दीड लाखाच्या आत आले.

अजित पवारांचा आमदार असूनही गेल्यावेळी लीड दिलेल्या हडपसरमध्ये आढळरावांना यावेळी ते मिळाले नाही. उलट कोल्हेंना ते मिळाले.विशेष म्हणजे आढळरावांना गेल्यावेळी जेवढे लीड हडपसरने दिले होते,तेवढेच ते त्यांनी यावेळी कोल्हेंना दिले.

त्यांना सर्वाधिक ५५ हजाराचे लीड आढळरावांचे एकेकाळचे कट्टर राजकीय शत्रू आणि अजित पवार समर्थक आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाने दिले.

तर,त्यानंतर बेनकेंच्या जुन्नरने त्य़ांना भरभरून (५१ हजार ५५९)मताधिक्य दिले. आंबेगावमध्ये ते ११ हजार ४५०,तर शिरुरला तीस हजाराचे मिळाले. या घवघवीत लीडने भोसरीतील नऊ हजाराची पिछाडी सहज भरून काढीत कोल्हेंनी जवळजवळ दीड लाखाच्या घरातील मताधिक्याने विजय मिळवला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT