MLA Mahesh Landge
MLA Mahesh Landge sarkarnama
पुणे

आमदार महेश लांडगे घेणार देशांतील सर्वांत मोठी बैलगाडा शर्यत; दीड कोटींची बक्षिसेही

उत्तम कुटे: सरकारनामा

पिंपरीः बैलगाडा शर्यतीवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने गत १६ डिसेंबरला सशर्त उठवली. त्यानंतर लाखो रुपयांचे इनाम असलेली पुणे जिल्ह्यातील पहिली ही शर्यत मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी आपल्या तालुक्यात नाणोलीमध्ये तर, शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी ती आपल्या गावात लांडेवाडीत (ता. आंबेगाव) ११ व १२ फेब्रुवारी रोजी भरवली. त्यानंतर आता भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे हे देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत आपल्या मतदारसंघात जाधववाडी, चिखली येथे २८ ते ३१ मे अशी चार दिवस घेणार आहेत.

केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते २८ तारखेला सकाळी सात वाजता शर्यतीचे उदघाटन होईल. दुसऱ्या दिवशी माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत आणि विधानपरिषद सदस्य गोपींचद पडळकर,तर तिसऱ्या दिवशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि कामगार नेते आमदार नरेंद्र पाटील हे शर्यतीला हजर असणार आहेत.

बक्षीस वितरण ३१ तारखेच्या सकाळी सात वाजता माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि श्रीक्षेत्र नारायणपूरचे अण्णामहाराज यांच्या यांच्या हस्ते होणार आहे.पिंपरी-चिंचवडचे भाजपचे पहिले व दुसरे महापौर आणि अनुक्रमे नितीन काळजे आणि राहूल जाधव हे ही या ग्रॅन्ड इव्हेंटचे आयोजक आहेत. ते दोघेही आमदार लांडगे यांचे कट्टर समर्थक आहेत.

जाधव यांचा बैलगाडा असून त्यांच्या बैलगाड्याने आमदार शेळकेंच्या नाणोलीतील शर्यतीत इनाम जिंकलेले आहे. तीन चारचाकी आणि १०३ दुचाकी, २२ तोळे सोने, दहा चांदीच्या गदा यासह लाखो रुपयांच्या रोख बक्षीसांची लयलूट या स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. दीड हजार बैलगाडे त्यात भाग घेणार असून ती पाहण्यासाठी अंदाजे दीड लाख शौकीन येणार आहेत. त्या प्रत्येकाला पिण्याच्या पाण्याची बाटली देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

तसेच पन्नास हजार पांढरे टी शर्ट,उन्हापासून बचावासाठी हजारो पांढऱ्या टोप्या आणि त्याच रंगाच्या छत्र्याही तयार ठेवण्यात आल्या आहेत.बैलगाडा शर्यतीसारखीच जलीकुट्टी ही शर्यत प्रचंड लोकप्रिय असलेल्या तमिळनाडूसह आंध्रप्रदेश, पंजाब, ओरिसा, मध्यप्रदेश, हरियाणा,गुजरात या राज्यांतूनही ही शर्यत पाहण्यासाठी रसिक येणार आहेत. जवळजवळ दीड कोटी रुपयांच्या बक्षीसांसह दोन कोटी रुपये खर्च या भव्य अशा राष्ट्रीय पातळीवरील बैलगाडा शर्यतीवर केला जाणार आहे.

बक्षीस म्हणून देण्यात येणाऱ्या दुचाकीच ८७ लाख रुपये किमतीच्या आहेत. शर्यत,तर होणारच शिवाय शर्यतीच्या बैलांचा रॅम्प वॉकही यानिमित्त देशात प्रथमच आयोजित करण्यात आला आहे. पहिल्या नंबराच्या बैलगाड्याच्या मालकाला १५ लाख रुपये रोख आणि एक बोलेरो जीप ईनाम आहे.गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु असलेली या शर्यतीची तयारी आता अंतिम टप्यात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT