ओतूर (जि. पुणे) : जुन्नर तालुक्यातील ओतूर ते ब्राम्हणवाडा या साडेदहा किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी तीन कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, या रस्त्याच्या कामावरून भारतीय जनता पक्ष (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) चांगलाच श्रेयवाद रंगला आहे. त्यातूनच भाजपच्या नेत्या आशा बुचके आणि राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके यांनी या रस्त्याचे एकाच दिवशी दोनदा भूमिपूजन केले आहे. श्रेय कोणीही घ्यावे; पण रस्त्याचे काम तातडीने पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. (Bhumi Pujan twice by BJP-NCP on the same day on the same road due to credit)
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आशा बुचके, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष तांबे, भगवान घोलप, संतोष खैरे आदींसह कार्यकर्त्यांनी ओतूर-ब्राम्हणवाडा चौकात या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केले. त्यानंतर अर्ध्या तासाने त्याच चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके, कात्रज दूध संघाचे संचालक बाळासाहेब खिल्लारी, अनिल तांबे, सरपंच गीता पानसरे आदींनी भूमिपूजन केले. या श्रेयवादाच्या लढाईत ओतूर परिसतील नागरिकांचे मात्र मनोरंजन झाले. याचे श्रेय कोणीही घ्या; पण या रस्त्याचे काम मार्गी लागल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.
ओतूर ते ब्राम्हणवाडा या रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डर नसताना आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भूमिपुजनाचा घाट घातल्याचा आरोप आशा बुचके यांनी केला. त्या म्हणाल्या की मी गेली तीस वर्षे राजकारण करत आहेत. मात्र, दुसऱ्याच्या कामाचे श्रेय कधी घेतले नाही. तसेच, खोटे भूमिपूजन व उद्घाटनही केले नसल्याचे त्यांनी भूमिपूजन प्रसंगी सांगितले. या वेळी भगवान घोलप, संतोष तांबे, संतोष खैरे आदींनी राष्ट्रवादीचा समाचार घेतला.
राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके भूमिपूजनप्रसंगी म्हणाले की, बऱ्याच दिवसांपासून ओतूर-ब्राम्हणवाडा रस्त्याचे काम व्हावे; म्हणून ओतूर, रोहोकडी, आंबेगव्हाण येथील ग्रामस्थांकडून सतत मागणी होत होती. त्यासाठी मी व खासदार डॉ अमोल कोल्हे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना भेटून याबाबतचे पत्र देऊन रस्त्याचे कामासाठी पाठपुरावा केला. ओतूर-ब्राह्मणवाडा रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्याबाबतचे पत्र दिले आहे. या वेळी कामाच्या मंजुरीचे पत्र आमदार बेनके यांनी उपस्थितांना दाखवून या कामाची वर्क ऑर्डरही येत्या दोन-तीन दिवसांत हातात येईल, असे सांगून या रस्त्याचे भूमिपूजन झाल्याचे जाहीर केले. तसेच, प्रत्यक्ष कामाला सुरुवातही आजच होणार असल्याचे जाहीर केले .
भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.