Deveshchandra Thakur
Deveshchandra Thakur Sarkarnama
पुणे

माझ्या राजकीय वाटचालीत विलासराव देशमुख, रामकृष्ण मोरेंचे मोठे योगदान : बिहारच्या नेत्याची कृतज्ञता

बंडू दातीर

पौड (जि. पुणे) : माझ्या जीवनात पहिले राजकारणी रामकृष्ण मोरे (Ramakrishna More) आले. तिथूनच माझ्यात सत्तेचे आकर्षण निर्माण झाले. रामकृष्ण मोरे, विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) हे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रतिभावान नेते होते. माझ्या राजकीय वाटचालीत दोघांचेही योगदान मोलाचे आहे, असे प्रतिपादन बिहार (Bihar) विधान परिषदेचे सभापती देवेशचंद्र ठाकूर (Deveshchandra Thakur) यांनी केले. (Big contribution of Vilasrao Deshmukh, Ramakrishna More in my political journey : Deveshchandra Thakur)

राज्याचे माजी शालेय शिक्षणमंत्री दिवंगत रामकृष्ण मोरे यांच्या जयंतीनिमित्त रामकृष्ण हरी कृषी प्रतिष्ठानच्या वतीने भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब लांडगे यांना (स्व.) रामकृष्ण मोरे जीवनगौरव, तर माजी खासदार, श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विदुरा नवले यांना कृतज्ञता पुरस्कार प्रदान करताना ठाकूर बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे होते. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार कपिल पाटील, माजी आमदार दिलीप ढमढेरे, सूर्यकांत पलांडे, राम कांडगे, संभाजी कुंजीर, माजी महापौर अंकुश काकडे, सुहास ढमढेरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष उल्हास पवार आदी उपस्थित होते. प्रतिष्ठानचे संस्थापक हरी चिकणे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. यावेळी बिहार निवासी असलेल्या ठाकूर यांच्या अस्खलित मराठी भाषणाचे सर्वांनी कौतुक केले.

ते पुढे म्हणाले की भारताचा इतिहास बिहारपासून सुरू होतो. बिहारचे राजकारण इतर राज्यांपेक्षा वेगळे चालते. तिथे विकासापेक्षा जातीय राजकारणच जास्त चालते. महाराष्ट्राशी माझे जवळचे नाते आहे. निवडणुकीत मतदारांना प्रशिक्षित करण्याची गरज आहे. बिहारला होणारी छटपूजा दिवाळीच्या सहाव्या दिवशी होते. ती सूर्याची पूजा असून त्याची महिला उपासना करतात.

डॉ. मोरे म्हणाले की, काही माणसे नेतृत्व करण्यासाठी जन्माला आलेली असतात. त्यात रामकृष्ण मोरे यांचे नाव घ्यावे लागेल. भारतीय कुस्ती ऑलिम्पिकमध्ये जाण्यासाठी बाळासाहेब लांडगे यांनी प्रयत्न करावा. नाना नवले यांच्या मनात वारकरी सांप्रदाय आणि संत तुकाराम महाराजांविषयी अखंड श्रद्धा आहे.

यावेळी बारणे, पाटील, पलांडे, नवले, लांडगे यांनी रामकृष्ण मोरे यांच्या जीवनातील अनेक पैलू, त्यांनी घेतलेले निर्णय सांगितले. ठाकूर यांच्या हस्ते नवले, लांडगे यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. प्रास्ताविक उल्हास पवार यांनी केले. सूत्रसंचालन संजय बालगुडे यांनी, तर मंदार चिकणे यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT