Pune News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्रिपदाच्या कामाचा वाढता व्याप आणि पक्षाची वाढती जबाबदारी लक्षात घेता अजितदादांनी बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या 32 वर्षांपासून अजित पवार हे पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदाची जबाबदारी सांभाळत होते. मात्र, अजितदादांनी मंगळवारी अचानक पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे आता यावर अजित पवार काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
अजित पवार यांनी बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला असला तरीही ते मार्गदर्शन करत राहतील, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडी यांनी दिली. अजित पवार यांनी संचालकपदाचा राजीनामा दिल्यामुळे आता त्यांच्या जागेवर ते कुणाला संधी देतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
अजित पवार हे बारामती तालुका अ वर्ग मतदारसंघातून गेली 32 वर्षे बँकेचे प्रतिनिधित्व करत होते. 1991 पासून अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखालीच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मोठी आर्थिक प्रगती केली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये देशातील सर्वात अग्रगण्य बँक म्हणून पुणे जिल्हा बँकेचा नावलौकिक आहे.
अजित पवार 1991 मध्ये जिल्हा बँकेचे संचालक झाले होते. त्यावेळेस बँकेचा एकूण व्यवसाय 558 कोटी रुपये इतका होता. मात्र, अजित पवारांनी सूत्रं हाती घेतल्यानंतर आज या बँकेचा व्यवसाय 20714 कोटी रुपये इतका विस्तारला आहे. हा व्यवसायदेखील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये सर्वाधिक आहे.
Edited by Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.