PCMC Sarkarnama
पुणे

प्रमोशनने अतिरिक्त आयुक्त होण्याची स्वप्न बघणाऱ्या अधिकाऱ्यांना मोठा धक्का : फडणवीस सरकारने बदलले नियम

Municipal Corporation News : पालिकेच्या तीन अतिरिक्त आयुक्त पदांपैकी एक पद आयएएस अधिकाऱ्यासाठी निश्चित करण्यात आल्याचा मोठा निर्णय. या निर्णयाचा प्रशासन आणि कामकाजावर काय परिणाम होणार, जाणून घ्या सविस्तर.

Rashmi Mane

PCMC Mahanagarpalika : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांच्या तीन पदांपैकी एक पद आता प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकाऱ्यासाठी राखीव ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या बदलामुळे प्रशासनातील शक्ती-संतुलन आणि पदोन्नतीची प्रक्रिया दोन्हीवर परिणाम होणार आहेत. उर्वरित दोन पदांपैकी एक पद नगरविकास विभागाकडून प्रतिनियुक्तीवर भरले जाणार असून, तिसरे पद महापालिकेतील पात्र अधिकाऱ्यांमधून पदोन्नतीने दिले जाईल.

1 सप्टेंबर 2014 रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ‘B’ वर्गात समावेश करण्यात आला होता. त्यानंतर नव्या प्रशासकीय आराखड्याची अंमलबजावणी करत सेवा प्रवेश व वर्गीकरणाचे नियम निश्चित करण्यात आले. या नव्या रचनेनुसार अतिरिक्त आयुक्तांची 3 पदे तयार करण्यात आली. यापूर्वी 2 पदे शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आणि 1 पद अंतर्गत पदोन्नतीद्वारे भरले जात होते. मात्र आता या पद्धतीत बदल करण्यात आला आहे.

नवीन नियमानुसार, एक अतिरिक्त आयुक्त थेट IAS अधिकारी असणार आहे. दुसऱ्या पदावर महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील गट-अ दर्जाचा अधिकारी नियुक्त होईल. तिसरे पद पूर्वीप्रमाणे महापालिका सेवेतील अधिकाऱ्यांना पदोन्नतीने मिळेल. मात्र जर पात्र अधिकारी उपलब्ध नसतील, तर त्या पदावरही शासन सेवेतील अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मुभा देण्यात आली आहे.

या निर्णयाची चर्चा मागील 4 वर्षांपासून सुरू होती. 28 डिसेंबर 2022 रोजी तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांनी अतिरिक्त आयुक्त पदावर IAS अधिकाऱ्याची प्रतिनियुक्ती करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. त्यानंतर सेवा नियमांमध्ये बदल करत भरती आणि पदोन्नती प्रक्रियेला अधिक स्पष्ट चौकट देण्यात आली.

पदोन्नतीसाठीचे निकषही अधिक कठोर करण्यात आले आहेत. उपायुक्त, सहायक आयुक्त किंवा समकक्ष पदावर किमान 15 वर्षांचा अनुभव आवश्यक असेल. तसेच मागील 10 वर्षांपैकी 9 गोपनीय अहवाल ‘उत्कृष्ट’ किंवा ‘अत्युत्कृष्ट’ असणे बंधनकारक आहे. त्यामुळे महापालिकेतील अधिकाऱ्यांसाठी अतिरिक्त आयुक्तपद मिळवणे आता अधिक कठीण होणार आहे. या बदलामुळे प्रशासन अधिक सक्षम आणि शिस्तबद्ध करण्याचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT