Pimpri : पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात सद्यस्थितीला सर्वाधिक ‘हेविवेट’ नेता म्हणून ओळखले जाणारे भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची राजकीय कारकीर्द 2014 पासून खऱ्या अर्थाने बहरली. राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते आणि माजी भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे यांचा अपक्ष उमेदवार म्हणून मोदी लाटेत 2014 ला पराभव केला. तेव्हापासून ते देवेंद्र फडणवीसांच्या ‘गुडबुक’मध्ये आहेत.
मतदारसंघ पुनर्रचनेत 2009 ला हवेली या त्यावेळच्या राज्यातील सर्वात मोठ्या विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. तोपर्यंत उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडचा समावेश लोकसभेला बारामती, तर विधानसभेला हवेली मतदारसंघात समावेश होता.
2009 ला शहरात भोसरी, पिंपरी आणि चिंचवड असे तीन विधानसभा मतदारसंघ निर्माण झाले. तर लोकसभेला पिंपरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा समावेश नवनिर्मित मावळ, तर भोसरीचा शिरूरमध्ये झाला. भोसरीचे पहिले आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास लांडे झाले. त्यावेळी महेश लांडगे यांना डावलण्यात आले. तोच त्यांच्या राजकीय जीवनाचा टर्निंग पॉइंट ठरला. पुढील पंचवार्षिकला 2014 ला ते भोसरीतून अपक्ष म्हणून उभे राहिले आणि मोदी लाटेतही त्यांनी निवडून येण्याचा करिष्मा केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष असा राजकीय प्रवास सुरू करणारे महेशदादा यांना 2002 ला पहिल्यांदाच महापालिका पोटनिवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. ही निवडणूक विलास लांडे यांच्या विरोधातील होती. त्यानंतर तब्बल 20 वर्षे संघर्षमय वाटचाल करीत त्यांनी शहराच्या ‘आश्वासक लीडरशिप’पर्यंत प्रवास केला आहे.
पिंपरी महापालिकेत सलग तीनदा नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर 2007 मध्ये स्थायी समिती सभापतिपदासाठी दावेदार म्हणून महेश लांडगेंचे नाव चर्चेत होते. मात्र, तत्कालीन सत्ताधारी पक्षश्रेष्ठींनी त्यांना डावलले. 12 वर्षे पक्षात झालेली ही घुसमट त्यांच्या समर्थकांमध्ये राजकीय इर्षा निर्माण करणारी ठरली.
2009 च्या विधानसभेला त्यांनी राष्ट्रवादीकडे (NCP) तिकिटाची मागणी केली. मात्र, राजकीय कुरघोडीच्या राजकारणात त्यांची संधी हुकली. त्यामुळे भोसरीच्या राजकारणात तत्कालीन आमदार विलास लांडे आणि महेश लांडगे असे दोन गट निर्माण झाले. राष्ट्रवादीला लांडगे यांच्या नाराजीचा फटका बसणार हे लक्षात आल्यानंतर त्यांना 2014 मध्ये संधी स्थायी समिती सभापतिपदासाठी संधी देण्यात आली. त्यामुळे लांडगे यांना राजकीय ताकद मिळाली. या संधीचे त्यांनी सोने केले. आपल्या समर्थकांची विकासकामे मार्गी लावली. त्यामुळे लांडगे गटाचे वर्चस्व वाढले होते.
2014 च्या विधानसभेला मात्र क्षमता असतानाही राष्ट्रवादीकडून त्यांना तिकीट नाकारण्यात आले. त्यामुळे भाजप, शिवसेना, मनसे अशा सर्वच प्रमुख पक्षांकडे त्यांनी तिकिटाची मागणी केली. मात्र, एकानेही संधी दिली नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी ही निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्धार केला.‘अपक्ष’ निवडणूक लढवत ‘नारळ’ या चिन्हावर विजयश्री खेचून आणली. प्रमुख पक्षांनी तिकीट नाकारलेले उमेदवार प्रचंड मोदी लाटेत अपक्ष निवडून येऊ शकतो, असा राजकीय चमत्कार पाहायला मिळाला.
आमदार लांडगे यांच्या राजकीय वाटचालीवर प्रकाश टाकला असता, 2002 मध्ये पहिल्यांदा महापालिका निवडणुकीत झालेला पराभव, सलग तीनदा निवडून आल्यानंतरही तब्बल 12 वर्षे महत्त्वाच्या पदापासून वंचित राहणे आणि 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून डावलणे… असे त्यांचे ‘राजकीय टर्निंग पॉइंट‘ दिसून येतात. त्यामुळे आज पिंपरी-चिंचवडची लीडरशिप करताना त्यांचा 20 वर्षांचा राजकीय संघर्षमय प्रवास लक्षवेधी वाटतो.
अत्यंत संवेदनशील राजकारणी म्हणून महेश लांडगे यांची ओळख आहे. आज (ता.27) त्यांचा वाढदिवस आहे. परंतु, त्याच्या पूर्वसंध्येला त्यांचे काका व स्वीकृत नगरसेवक गोपीकृष्ण धावडे यांचे वडील भास्कर रामभाऊ धावडे यांचे काल (ता.26) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यामुळे आमदार लांडगे यांनी सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.