Chandrakant Patil-Vaijayanta Umargekar-Ajit Pawar Sarkarnama
पुणे

चंद्रकांत पाटलांसमोरच भाजप नगराध्यक्षाने पाणी योजनेचे क्रेडीट दिले अजितदादांना!

आळंदीतील भाजप पदाधिकारी ‘व्हॅलेटाईन डे’च्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या प्रेमात पडल्याची चर्चा रंगली आहे.

विलास काटे

आळंदी : भारतीय जनता पक्षाच्या सभेत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासमोरच पक्षाच्या आळंदीच्या (ता. खेड) नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर यांनी भामा आसखेड योजनेचे पाणी मिळण्यासाठी भाजपच्या नेत्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते (Dilip Mohite) यांचेही मोठे योगदान आहे, असा उल्लेख आवर्जून केला. त्यावेळी व्यासपीठावरील उपस्थित भाजप पदाधिकऱ्यांच्या भूवया उंचावल्या. त्यानंतर उद्या (ता. १४ फेब्रुवारी) राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या हस्ते शहरातील कामांचे भूमिपूजन होणार आहे, त्यामुळे आळंदीतील भाजप पदाधिकारी ‘व्हॅलेटाईन डे’च्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या प्रेमात पडल्याची चर्चा रंगली आहे. (BJP council chairman credit for Bhama Askhed water scheme to Ajit Pawar in front of Chandrakant Patil)

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील सव्वा आठ कोटींच्या निधीतून आळंदी शहरांतर्गत रिंगरोडच्या कामाचे भूमिपूजन स्वतंत्रपणे राष्ट्रवादीकडून केले जात आहे. तर आळंदी नगरपरिषदेकडून साडे चार कोटीहून अधिक निधीतून विविध ठिकाणी झालेली रस्त्यांची कामे, स्मशानभूमीच्या कामांचे उद्‌घाटन स्वतंत्रपणे केले जात आहे. दोन्ही उद्‌घाटने आणि भूमिपूजने सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे आणि आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते सोमवारी होणार आहे. भाजपची सत्ता असूनही राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांकडून उद्‌घाटने होत असल्याने आगामी नगरपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नवीन राजकिय गणिते मांडली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सुवर्णजयंती जिल्हा नगरोत्थान योजनाअंतर्गत साडेचार कोटींचा निधी पालिकेस मंजूर होता. त्यातून प्रभाग क्रमांक चारमध्ये आळंदी पोलिस ठाणे ते ग्रामदैवत खंडोबा मंदिर रस्ता, दत्तमंदिर ते कुऱ्हाडे निवास रस्ता, शिगवणकर धर्मशाळा ते मल्हार हाईट रस्ता, भाजी मंडई ते नगरपरिषद कार्यालय रस्ता कॅंक्रिटीकरण काम पूर्ण झाले आहे. प्रभाग क्रमांक तीनमध्ये मामासाहेब मोहोळ धर्मशाळा ते घुले निवास रस्ता, नरहरी महाराज चौधरी ते कथले निवास रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे उद्‌घाटन होणार आहे. आमदार दिलीप मोहिते यांच्या प्रयत्नांतून झालेल्या स्मशानभूमीत बसविलेल्या गॅस शवदाहिनीचे कामाचे उद्‌घाटन केले जाणार आहे. प्रभाग क्रमांक दोनमध्ये आळंदी ते मरकळ रस्त्यावर प्रतिक प्लायवूड ते शिर्के निवास रस्ता कॉंक्रिटीकरण आणि प्रभाग क्रमांक चारमध्ये पेव्हिंग ब्लॉकच्या कामाचे भूमिपूजन होत आहे.

आळंदी शहर राष्ट्रवादीकडून स्वतंत्रपणे तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून चाकण चौक ते पद्मावती मंदिर जोडणाऱ्या पंधरा मीटर रूंद रस्ता,पद्मावती मंदिर ते भैरवनाथ मंदिर बारा मीटर रूंद रस्त्याचे भूमिपूजन केले जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT