NCP, BJP Sarkarnama
पुणे

Pimpri Chinchwad Politics : पवना बंद जलवाहिनीचे राजकारण; बंदी उठताच भाजप अन् राष्ट्रवादीत श्रेयवाद उफाळला

Ajit Pawar Group Vs BJP : अजित पवार गट आणि भाजपचे पदाधिकारी आमनेसामने

उत्तम कुटे

Pawana Jalvahini News : मावळ तालुक्यातील पवना धरणातून बंद जलवाहिनीद्वारे पिंपरी-चिंचवडसाठी पाणी आणण्याच्या योजनेवरील बंदी राज्य सरकारने नुकतीच उठवली. त्यावरून राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात पिंपरी-चिंचवडमध्ये श्रेयाची लढाई सुरू झाली आहे. (Latest Political News)

दहा वर्षांच्या आपल्या पाठपुराव्यांमुळे १२ वर्षांची ही बंदी उठल्याचा दावा उद्योगनगरीतील भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी रविवारी केला होता, तर उपमुख्यमंत्री अजितदादांचे हे पिंपरी-चिंचवडकरांना मोठे गिफ्ट असल्याचा दावा अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी सोमवारी केला.

दरम्यान, भाजप, शिवसेना, आरपीआय आणि भारतीय किसान महासंघाने मावळात आपला विरोध कायम असल्याचे सांगत हा प्रकल्पच रद्द करण्याची मागणी पुन्हा केली आहे. त्यामुळे बंद जलवाहिनी प्रकल्पाचे भवितव्य पुन्हा लटकले आहे. परिणामी हा प्रकल्प होईल की नाही याची खात्री नसतानाही त्यावरील फक्त बंदी उठल्यावरूनच भाजप आणि राष्ट्रवादीत श्रेयाची लढाई सुरू झाल्याचे दिसून येत आहे. (Maharashtra Political News)

पिंपरी-चिंचवडकरांच्या हितासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुढाकारातून २००९ मध्ये हाती घेतलेल्या बंद जलवाहिनीला विरोध होता. यातून २०११ मध्ये झालेले आंदोलन आणि गोळीबारामुळे प्रकल्पाला स्थगिती मिळाली. मात्र, सत्तेची सूत्रे हाती येताच शहरातील पाणीटंचाईचा विचार करून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ही स्थगिती उठविण्यात मोलाची भूमिका बजावत शहरवासीयांना मोठे गिफ्ट दिल्याचे गव्हाणे म्हणाले.

'राज्यातील आणि महापालिकेतील सत्ता गेल्यानंतर हा प्रकल्प बासनातच गेल्याचे मानले जात होते. मात्र, पुन्हा सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार यांनी या प्रकल्पासाठी पुन्हा पुढाकार घेऊन नगरविकास विभागाकडे पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी माझ्यासह व इतर पदाधिकाऱ्यांनी आग्रह धरला होता. त्यावर त्यांनी वेगवान हालचाली करत हा निर्णय घेतला', असे 'सरकारनामा'शी बोलताना गव्हाणे यांनी सांगितले.

भाजपचे दिवंगत आमदार जगतापांचे यश

पवना बंद जलवाहिनी प्रकल्पावरील स्थगिती उठविण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे भाजपचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष शंकर जगताप यांनी स्वागत केले. 'या प्रकल्पासाठी चिंचवडचे दिवंगत भाजप आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना आज यश मिळाले. या प्रकल्पासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनीही राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. त्यांचेही हे यश आहे,' असेही शंकर जगतापांनी स्पष्ट केले.

'ही स्थगिती उठवण्यासाठी तत्कालीन आमदार लक्ष्मण जगताप यांनी सतत पाठपुरावा केला, सातत्याने प्रयत्न केले, त्याला आज यश मिळाले,' असे पिंपरी पालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा सभापती राजेंद्र राजापुरेही म्हणाले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT