Pune BJP Vs Congress Sarkarnama
पुणे

Video - Pune BJP Vs Congress : पुण्यात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने ; काँग्रेस भवनला छावणीचं स्वरूप!

Mayur Ratnaparkhe

Pune News : पुण्यात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर भाजपने काँग्रेस भवन येथे जाऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. नंतर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते काँग्रेस भवन येथे जमले असून भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शहरातील मध्यवर्ती भागात धीरज घाटे(Dheeraj Ghate) यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करणारे फ्लेक्स लावले आहेत. भाजपकडून लावण्यात आलेल्या या फ्लेक्समध्ये राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर फुली मारण्यात आली आहे.

तसेच या पोस्टरमध्ये राहुल गांधींच्या बाजूला स्वामी विवेकानंद यांच्या फोटो लावण्यात आला आहे आणि याखाली कॅप्शन मध्ये"खबरदार हिंदू धर्माला नावे ठेवाल तर समुद्रात फेकून देईल" असा मजकूरही छापण्यात आला आहे. याच पोस्टरवरून घाटे यांना प्रत्युत्तर देताना काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या बाबत एक मोठं विधान केलं, ज्यावरून वाद उफाळण्याची चिन्हं आहेत.

अरविंद शिंदे(Arvind Shinde) म्हणाले, 'धीरज घाटे जे बोलले की काँग्रेस शहाराध्यक्ष मद्य पिऊन बोलत आहेत. त्याला माझं उत्तर असं होतं की त्यांनी सांगावं, त्यांनी यावं. ज्या पद्धतीने ते स्वत: एकटं फिरू शकत नाहीत. त्यांना फिरण्यासाठी सुद्धा पोलीस संरक्षण लागतं. त्या धीरज घाटेंना काँग्रेस आणि काँग्रेस शहराध्यक्षांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही.'

'घाटेंना एकटं फिरता येत नाही, त्यांचे जे कर्म आहेत त्यामुळे त्यांना बॉडीगार्ड लागतात. ते बॉडीगार्डशिवाय फिरू शकत नाहीत. त्यांना आमच्यावर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांना त्यांचा मर्डर होईल अशी भीती असल्यानेच ते बॉडीगार्ड घेऊन फिरत आहेत. जर त्यांनी तशी भीती नसेल तर त्यांनी बॉडीगार्ड शिवाय फिरावं. घाटेंनी स्वत: पोलिसांना पत्र दिलेलं आहे की माझ्या जीवाला धोका आहे, मला संरक्षण हवं आहे. आता त्यांनीच सांगितलं पाहीजे की कुणाकडून त्यांच्या जीवाला धोका आहे. असे कोणते कर्म आहेत तुमचे की तुमच्या जीवाला त्यामुळे धोका आहे? याचं उत्तर त्यांनीच दिलं पाहीजे.'

काँग्रेस(Congress) शहाराध्यक्षांच्या या विधानानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले असून काँग्रेसला जशास तसे उत्तर देण्याची भाषा करू लागले आहेत. शिंदे यांनी घाटे यांच्या जीविताबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या विरोधात भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्यावतीने काँग्रेस भवनाच्या समोर तीव्र स्वरूपात आंदोलन करणार आहे.

तर भाजपकडून(BJP) आंदोलन करण्यात येणार असल्याची कुणकुण लागताच मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेस भवन परिसरात जमा झाले आहेत. यामध्ये महिला कार्यकर्त्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. खुद्द शहराध्यक्ष देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. भाजपने जर शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं तर ठीक आहे, अन्यथा भाजपाला जशास तसे उत्तर देऊ असं काँग्रेस कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.

दुसरीकडे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी देखील मोठ्या प्रमाणात फौजफाटा या ठिकाणी तैनात केला आहे. थोड्याच वेळात आंदोलनाच्या वेळी नेमकं काही होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT